नॅशनल फुटबॉल रेफ्री एक्झामध्ये कोल्हापूरचे अजिंक्य गुजर उत्तीर्ण

सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:30 IST)
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने आयोजित केलेल्या कॅट-टू नॅशनल रेफ्री एक्झाममध्ये कोल्हापूरचे जाणकार पंच अजिंक्य गुजर हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता राष्ट्रीय पंच असा दर्जा प्राप्त झाला आहे.
 
गेल्या जानेवारी महिन्यात वेस्टनई इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने भारतातील चार विभागांमध्ये फ्री-एक्झामचे आयोजन केले. 4 जानेवारीला मुंबईमध्ये झालेल्या प्री-एक्झाममध्ये कोल्हापूरचे अजिंक्य यांच्यासह महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील 27 पंच सहभागी होते. या एक्झाममध्ये घेतलेल्या फिजीकल चाचणीत सरस ठरलेले अजिंक्य गुजर यांच्यासह 9 जणच ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या अवघड अशा कॅट-टू नॅशनल रेफ्री एक्झामसाठी पात्र ठरले होते. गेल्या 16 फेब्रुवारीला कॅट-टू नॅशनल रेफ्री एक्झाम झाली. यामध्ये संपूर्ण भारतातून केवळ 65 पंचच सहभागी होते. या एक्झामअंतर्गत घेण्यात आलेल्या फिजीकल व लेखी परिक्षेत अजिंक्य गुजर यांनी अंगभूत कौशल्याच्या जोरावर उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय पंचचा दर्जा प्राप्त केला. अजिंक्य हे राजेंद्र दळवी, प्रसाद कारेकर यांच्यानंतर कोल्हापूरचे तिसरे राष्ट्रीय पंच म्हणून अधोरेखित झाले आहेत. अजिंक्य यांनी स्थानिक प्रॅक्टीस फुटबॉल क्लबकडून तब्बल 14 वर्षे खेळताना आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर फुटबॉल शौकिनांची मने जिंकली होती. त्यांच्या खेळावर खुष होऊन मुंबईतील आरसीएफ संघाच्या व्यवस्थापनाने आरसीएफ संघाकडून खेळण्याची त्यांना दिली. ही संधी सार्थ ठरवत त्यांनी मुंबई, दिल्लीमध्ये झालेल्या विविध स्पर्धा खेळल्या. तसेच अजिंक्य हे 2009 पासून कोल्हापुरातील शाहू स्टेडियममध्ये होणाऱ्या स्थानिक फुटबॉल स्पर्धांमध्ये पंचगिरी करत आहेत. त्यांनी मधल्या काळात मुंबई, मिरज, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कर्नाटक येथे झालेल्या स्थानिक व राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्येही पंचगिरी केली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती