खडसे भाजपला आणखी एक धक्का देणार; जळगावातील ८ नगरसेवक फुटणार

गुरूवार, 1 जुलै 2021 (18:20 IST)
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात भाजप आणि गिरीश महाराज यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपवर नाराज असलेले आणखी ८ नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. यापूर्वी भाजपचे २७ नगरसेवक फुटले. त्या गटासोबत हे ८ नगरसेवक फुटून जाणार आहेत, असेही खडसे म्हणाले. खडसेंच्या या दाव्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र, २७ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करुन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तांतर होऊन शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला. महत्वाची बाब म्हणजे जळगाव महापालिकेत महापौर आणि विरोधी पक्षनेतेही शिवसेनेचे आहेत. महापौर जयश्री महाजन या आहेत, तर त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत.
 
जळगाव महापालिकेवर सत्ता असताना आम्ही महापालिका कर्जमुक्त केली अशी घोषणा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र, आज प्रत्यक्षात महापालिकेवर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे त्यांनी जळगावकरांची फसवणूक केली आहे, असा आरोपही खडसे यांनी महाजनांवर केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती