खडसे राष्ट्रवादी संपवताय, त्यांची आमदारकी परत घ्या’,मंत्री गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (08:10 IST)
जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे पाच उमेदवार विजयी झाले यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या विरोधात चांगलाच टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे खच्चीकरण केले असल्याने निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यांची आमदारकी आता परत घ्यायला पाहिजे कारण, त्यांनी राष्ट्रवादी संपवायला काढली आहे, असेही ते म्हणाले.
 
जळगाव दूध संघाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटानं एकनाथ खडसे गटाचा पराभव करत जळगाव जिल्हा दूध संघाची सत्ता काबीज केली आहे. २० पैकी १६ जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत. तर ४ जागांवर एकनाथ खडसे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर टिका केली.
 
“सहकाराची निवडणूक ही थेट पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी पक्षाच्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांनी राहायला हवं अशी अपेक्षा असते. किमान विरोधी पक्षाच्या गोटातून तरी त्यांनी निवडणूक लढवायला नको असं मानल जात होते. मात्र, खडसे यांचे अगदी निकटवर्तीय असलेल्या पाच उमेदवारांनी गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनल कडून उभे राहून खडसे यांच्या सहकार पॅनल विरोधात विजय मिळवला आहे. त्यामुळं खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली असल्याचं आता विरोधक तोंडावर बोलत आहेत. या निवडणुकीत निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली असल्यानं तुमची आमदारकी परत घ्यायला पाहिजे”, अशा प्रकारची खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
 
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी लढवली खडसेंविरोधात निवडणूक
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार दिलीप वाघ, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, प्रदीप निकम, शामल झाम्रे, मधुकर राणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी ऐनवेळी खडसे यांच्या महाविकास आघाडीला राम राम केला. हे सर्वजन गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलला जाऊन मिळाले. त्यामुळे शेवटच्या क्षणी खडसे यांना धक्का बसला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती