के. के. वाघ शिक्षण संस्थेचा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ दु:खद निधन

सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (07:51 IST)
नाशिक  के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ ऊर्फ भाऊ यांचे रविवार (दि.०६) वयाच्या ९० व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज पंचवटी येथील, के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल.
 
बाळासाहेब  वाघ यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी ह्या छोट्याशा गावी आपल्या आजोळी दि.१९ ऑक्टोबर १९३२ रोजी देवराम ऊर्फ पद्मश्री कर्मवीर काकासाहेब व गीताई वाघ या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांना लहानपणापासून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील, कुसुमाग्रज व आजोबा सयाजीबाबा वाघ अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभला.
 
बाळासाहेब हे आजवर अतिशय निरोगी व समृद्ध आयुष्य जगले. त्यांनी आपले वडील देवराम तथा पद्मश्री (कै) कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या नंतर सामाजिक, सांस्कृतिक, सहकार व शैक्षणिक वारसा समर्थपणे पुढे चालविला. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सन १९७० साली के.के.वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. सन २००६ पर्यंत संस्थेचे ‘उपाध्यक्ष’ तर २००६ पासून आजपर्यंत ‘अध्यक्ष’ म्हणून तब्बल ५१ वर्ष खंबीरपणे संस्र्थेची धुरा सांभाळली. त्यांच्या जाण्याने ही पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे. के के वाघ संस्थेच्या रोपट्याचे त्यांनी महाकाय वटवृक्षात रुपांतर केले. संस्था उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा होता.
 
शासकीय कृषि महाविद्यालय, पुणे येथे बी.एस्सी.(अॅग्री.) ही पदवी संपादीत केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ १९६०-६१ साली अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साखर कारखाना येथे ‘कृषी अधिकारी’ या पदापासून केला. पुढे त्यांनी कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे ‘सचिव’ म्हणून व नंतर निफाड सहकारी साखर कारखान्याचे ‘जनरल मॅनेजर’ म्हणून काम पाहिले. सन १९७२ ते १९७९, १९८४ ते १९९५ व २००२ ते २००६ अशा विविध कालखंडामध्ये त्यांनी तब्बल २२ वर्षे कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे ‘अध्यक्ष ’पद भूषविले.
 
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, डेक्कन शिखर संस्था, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑप.लि., डिस्टिलरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य साखर कारखान्यांची कार्यकारी समिती अशा विविध संस्थावर त्यांनी संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य अशा विविध पदांवर कामकाज केले.
 
महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालय संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित तंत्रनिकेतन संघटना या तिन्ही राज्यस्तरीय संघटनांच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तर स्थापनेपासून ते आजपर्यंंत या तिन्ही संघटनेचे एकोणावीस वर्षे ‘अध्यक्ष’ म्हणून कार्यरत होते. मा. बाळासाहेब यांनी संघटनेचे वेळोवेळी विविध विभागांमार्फत शासनदरबारी प्रश्न मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्न तडीस नेले.
 
काकासाहेबनगर येथील निफाड तालुका ग्राहक मंडळ, ग्राहक सहकारी संस्था, फळ व भाजीपाला संघ, मेडिकल ट्रस्ट अशा अनेक कृषि आणि सामाजिक संस्थेच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या पुढाकाराने निफाड तहसील कार्यक्षेत्रात २५० कर्मवीर बंधारे बांधून ते पूर्ण करण्यात आले. या योगदानामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला आहे.
 
महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या दुसरा महाराष्ट्र जलसिंचन आयोगात त्यांची ‘सदस्य’ म्हणून कामकाज केले. या कार्यामुळे महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला नवी दिशा व नवी गती मिळाली आहे.
 
व्रतस्थ गांधीवादी राहणी व विचारसरणी, आधुनिकतेकडे असलेला कल, शांत, संयमी, कार्यकुशल व त्यागी व्यक्तिमत्तवाने आकारास आणलेले कृषि, शिक्षण, जलसंधारण, कारखानदारी, संघटन, सहकार या विविध क्षेत्रांमधील कार्य मौलिक व दखलपात्र स्वरूपाचे आहे.
 
त्यांच्या या दीर्घकालीन शैक्षणिक, कृषी व सामाजिक कार्याची दखल घेत आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन २००८ साली रोटरी क्लब ऑफ नाशिक यांचेकडून ‘नाशिक भूषण’ पुरस्कार, २००९ साली पुणे विद्यापीठाकडून ६० व्या वर्धापनदिना निमित्त मानाचा ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’, अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘EDUPRAENEURS AWARD-2013’ पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
 
त्याच प्रमाणे, २०१९ मध्ये तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बद्दल भारती तंत्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली तर्फे ‘लाईफ टाईम एक्सलेंस मानपत्र’ पुरस्कार, गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे ‘शिक्षण महर्षी’ पुरस्काराने सन्मानित, दै.भास्कर वृत्त समुहातर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘प्राउड महाराष्ट्रीन ऍवार्ड-२०१९’ या पुरस्काराने सन्मान, २०१८ मध्ये स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुणे येथे ‘पितृ पुरस्कार’ या पुरस्कार, तसेच मराठी पत्रकार संघातर्फे सामाजिक योगदानाबद्दल ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती