Jumbo Covid Center scam case:कोरोनाच्या काळात जंबो कोविड सेंटरच्या साहित्य खरेदी मध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केला असून या प्रकरणात संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात ईडी कडून न्यायालयात आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात बीएमसी अधिकारी आणि काही नेत्यांना सुमारे 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची सोन्याची बिस्किटे, गोल्ड बार, आणि सोन्याच्या नाणी देण्यात आल्याचा दावा केला आहे.
ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात सुजित पाटकर हे प्रमुख आरोपी आहेत. कोर्टाकडून या आरोपपत्राची दखल घेण्यात आली असून, सर्व आरोपींना चार ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4 ऑक्टोबरला दोषारोप निश्चित होणार आहेत. सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा, राजीव साळुंखे, अरविंद सिंग आणि डॉ किशोर बिसुरे असे या जंबो कोविड सेंटर प्रकरणातील आरोपी आहे.