जितेंद्र आव्हाड म्हणतात, आता माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही..

बुधवार, 23 मार्च 2022 (09:07 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (22 मार्च) दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या.
 
"श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही," असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
 
ते म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरूंगात डांबलेलं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. विरोधकांनी सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे.
 
तपास यंत्रणेचा गैरवापर करुन जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते महाराष्ट्रातील जनता बघतेय. तुम्ही आम्हाला कितीही डिवचलंत, तरी आम्ही कोसळणार नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती