जबरी चोरी व घरफोडीतील कुख्यात जिगर बोंडारे अटकेत

बुधवार, 5 मे 2021 (11:14 IST)
जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यातील फरार आरोपी भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (उमाळा – जळगाव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. जिगर बोंडारे याने आतापर्यंत एकुण 26 गुन्हे केले आहेत.
 
जिगर बोंडारे याच्यावर जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, रामानंदनगर, शनिपेठ,अडावद, जिल्हापेठ, एरंडोल, धरणगाव, जामनेर अशा विविध पोलिस स्टेशनला एकुण 26 गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. जयंत चौधरी, प्रदीप पाटील पो. ना. विजय शामराव पाटील, पंकज शिंदे, अविनाश देवरे, दिपक शिंदे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला औरंगाबाद येथील उस्मानपुरा भागातून शिताफीने अटक केली.
 
सहा महीण्यापुर्वी जिगर बोंडारे याने त्याच्या साथीदारांसह एका कारचालकास अडवून त्याला पिस्तुलचा धाक दाखवत त्याच्या डोळ्यात मिरची पुड फेकून त्याच्याजवळ असलेली रोकड व मोबाईल हिसकावला होता. त्यानंतर कारचालकास कारमधे सोडून सर्व जणांनी पोबारा केला होता. दरम्यानच्या काळात जिगर बोंडारे याने दोन घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती