एकनाथ शिंदेंच्या सुट्टीमागे 'राजकीय अस्वस्थते'चं कारण आहे का?

बुधवार, 26 एप्रिल 2023 (22:16 IST)
social media
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर गेले आहेत.
 
शिंदे अधिकृत सुट्टीवर नसल्याचं सांगितलं जात असलं, तरी 26 एप्रिलपर्यंत साताऱ्याला त्यांच्या गावी असणार आहेत. काही कौटुंबिक कारणांमुळे ते गावी गेल्याचं सांगितलं जातंय.
 
एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर आहेत का? ते भविष्यात मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नांवर आता कुठे पडदा पडतो, असं वाटत असताना दिल्लीत राज्यातल्या मुख्यमंत्री बदलासाठी बैठका सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
याचवेळी मुख्यमंत्र्यांचे असे अचानक सुट्टीवर जाणे, अनेकांना कोड्यात टाकणारा ठरतोय. त्यात, सध्याच्या या चर्चेमुळे शिवसेनेत आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का? हा प्रश्न उपस्थित करतो.
 
मुख्यमंत्री सुट्टीवर जाण्याचं काय कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी, 24 एप्रिलला जिल्हाधिकारी आणि विभागिय आयुक्तांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर ते साताऱ्याला दरे या त्यांच्या मूळ गावी निघून गेले.
 
काही घरगुती कारणासाठी कुटुंबासोबत गेले असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं.
 
त्याचबरोबर साताऱ्यात मुख्यमंत्र्यांचे काही कार्यक्रम असल्याचीही माहिती आहे. या सुट्टीनंतर राजकीय वर्तुळात शिंदे यांच्या अस्वस्थतेची चर्चा सुरू झाली.
 
पण असं अचानक गावी जाण्याचं काय कारण आहे, हे शिवसेनेच्या आमदारांना विचारले असता, शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची तब्येत बरी नाही म्हणून कुटुंबासाठी त्यांनी दोन-तीन दिवस दिले, तर यावर इतकं राजकारण करण्याची काय गरज आहे?
 
"आधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षे घरातून काम करत होते. त्यांची तब्येत बरी नसताना आम्ही त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली."
 
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, "आज मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची तब्येत बरी नाही. तर त्यावर इतकं राजकारण करण्याची काय गरज आहे? त्यांचे काही घरगुती धार्मिक कार्यक्रमही आहेत. त्यांना कुटुंबासाठी थोडा वेळ देऊ देत."
 
घरगुती अडचणींबाबत राजकारणात बोललं जात नाही, पण राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आणि तीच वेळ मुख्यमंत्र्यांनी सुट्टीवर जाण्यासाठी निवडली म्हणून याकडे राजकीयदृष्ट्या बघितले जात आहे.
 
याबाबत संजय शिरसाट म्हणतात, "आमची शिवसेनेची भाजपसोबत विश्वासाने युती झाली आहे. त्या युतीमध्ये एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. या युतीत काहीही झालं तरी भाजप एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरून हटवणार नाहीत, याची 100% खात्री आम्हाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये आणि आमच्या आमदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. उगाच या गोष्टींना राजकीय हवा दिली जात आहे."
 
चर्चेची पार्श्वभूमी काय?
काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुप्रिम कोर्टाचा निकाल आल्यानंतर राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यासाठी अजित पवारांचा पर्याय भाजपकडे असल्याचं बोललं जात होतं.
 
'सामना'चे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक'मध्ये लिहिलं की, “व्यक्तिगत निर्णय जर कोणाला घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. पण पक्ष म्हणून भाजपबरोबर जाण्याचा प्रश्न येत नाही."
 
पण या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचं सांगत अजित पवार यांनी यावर पडदा टाकला. पण तोपर्यंत शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वाढल्याची दिसली.
 
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, “अजित पवार जर वेगळा गट म्हणून शिवसेना भाजप युतीत सामिल झाले तर त्यांचं स्वागत असेल पण जर राष्ट्रवादीसह ते आले तर सेना सत्तेबाहेर असेल. मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे राहतील.”
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याबाबत काहीही बोलण टाळलं.
 
त्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असल्याचं वक्तव्य केलं.
 
मराठा आणि सहकाराशी संबंधित असलेला चेहरा भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून आणण्याची तयारी सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटल्यावर पुन्हा एकदा सरकारमध्ये अस्वस्थता पसरली.
 
वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यंवंशी सांगतात, “मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेले याबाबत मी ट्वीट केलं. पण त्यांच्या कार्यालयाकडून ते घरगुती कार्यक्रमासाठी गेल्याचं सांगितलं. पण हे कारण एखाद्या दिवसासाठी सांगणं ठिक आहे. पण तीन दिवस मुख्यमंत्री रजेवर गेले आहेत. त्याआधी आठ दिवसांपासून त्यांच्या म्हणाव्या तशा बैठका होत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सतत काम करणारे मुख्यमंत्री या चर्चा सुरू असताना बैठका घेणं कमी करतात. मंत्रायलात येणं कमी करतात. सुट्टीवर निघून जातात. याला निश्चित काही राजकीय कारणं आहेत.”
 
सुट्टीवर टीका, मग सारवासारव?
बारसू रिफायनरीबाबत इतकं मोठं आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौऱ्यावर टीका होऊ लागली.
 
याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे हे स्वत:ला गरिबांचे कैवारी समजतात, जे सध्या हेलीकॉप्टरने त्यांच्या गावी तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या घराजवळ हेलीकॉप्टर आहे. त्यांनी तेच हेलीकॉप्टर घेऊन बारसुला जावं आणि तिथे आंदोलक बसले आहेत, त्यांची अवस्था समजून घ्यावी.”
 
मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. मग मुख्यमंत्री त्यांच्या शेतात पाहणी करत आहेत, त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाईंशी चर्चा करत असल्याचे व्हीडिओ समोर आले. यातून ते ‘नॉटरिचेबल’ नसून लोकांना भेटत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
त्याचबरोबर दौऱ्यावर असूनही मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे 65 फाईल्सचा निपटारा केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आली. शिवाय, सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.
 
लोकमत वृत्तपत्राचेचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात, “मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या आमदारांना भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी फार वाव आहे असं वाटत नाही. पण या सुट्टीच्या चर्चेतून ती अस्वस्थता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्याचबरोबर इतक्या फाईल्सचा कसा निपटारा केला याची सारवासारव लोकांसमोर ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजपवर त्याचा कितपत परिणाम होईल हे सांगता येणार नाही”.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (26 एप्रिल) रात्री नागपूरला जाणार आहेत. उद्या अमित शहांसोबत त्यांचा कार्यक्रम आहे.
 
अमित शहा यांना भेटून शिंदेंची राजकीय अस्वस्थता वाढते की कमी होते, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती