मी येतो म्हटलं की ते पळून जातात, संजय राऊत याचे विधान

बुधवार, 26 एप्रिल 2023 (21:35 IST)
राहुल कूल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे सादर करण्यासाठी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महिन्यापासून वेळ मागतोय, पण ते वेळ द्यायला तयार नाहीत. मी येतो म्हटलं की ते पळून जातात, असं विधान राऊतांनी केलं. ते दौंड तालुक्यातील वरवंड येथील ‘पोलखोल’ सभेत बोलत होते.
 
यावेळी राऊत म्हणाले, “हे बेकायदेशीर आणि बोगस राज्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मी गृहमंत्र्यांकडे वेळ मागत आहे. माझं सरकारकडे कोणतंही वैयक्तिक काम नाही. मी गेली ४०-४२ वर्षे राजकारणात आहे. २२-२३ वर्षांपासून मी खासदार आहे. मी कोणत्याही वैयक्तिक कामासाठी मंत्रालयात जात नाही. पण मी दोन कामांसाठी फडणवीसांकडे वेळ मागितली. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भंगारात जातोय. शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. तुमचे लाडके चेअरमन राहुल कूल यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून ठेवला आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्यांनी अगदी लहान-लहान गोष्टींत पैसे खाल्ले आहेत.”
 
“पैसे खायची पण एक प्रतिष्ठा असते. राजकारणात सन्मानाने पैसे खायचे असतात, तेही तुम्हाला जमत नाही. याचा खुलासा करण्यासाठी मी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे वेळ मागतोय. मला राज्याच्या हिताची माहिती द्यायची आहे. पण ते माझ्यापासून दूर पळून जातात. मी येतो म्हटलं की ते पळून जातात. तुम्ही कुणाला वाचवत आहात? भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहात का? शेवटी मी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. आता सीबीआय काय करतंय बघू… मग मी ईडीकडे तक्रार दाखल करेन. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाईन. २०२४ ला आपलं सरकार येणारच आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे आपलं सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोण वाचवतं, तेच मी पाहतो…तुम्हाला ५०० कोटी पचू देणार नाही” अशा शब्दांत राऊतांनी राहुल कूल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती