बीड : मनोज जरांगेच्या बीडमधील इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना सुट्या देण्याचे आदेश काढले. दरम्यान, आता याच आदेशावरून मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतेय का? असे असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
बीडच्या शिक्षण अधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची प्रत ट्वीट करत भुजबळ यांनी म्हटले आहे की, कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्या जाहीर करण्याचे कारण काय?, कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण, त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणे किंवा सुटी जाहीर करणे नक्कीच चुकीचे आहे.
काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुटी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुटीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता. आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिका-यांकडून देण्यात आले असल्याचे भुजबळ म्हणाले.