शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात शाळेत अपुरी शिक्षक संख्या !

शुक्रवार, 12 मे 2023 (07:31 IST)
सावंतवाडी :शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अपुरी शिक्षकसंख्या असल्याने एकाच शिक्षकावर शाळा चालवण्याची वेळ वेळ कुणकेरी शाळेवर आलीये . त्यामुळे येते नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळेत शिक्षक द्या या मागणीसाठी पालक शिक्षक समिती आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. कुणकेरी शाळा नंबर १ या शाळेत मुख्याध्यापकच एकटेच क्लास घेत असल्याने या एका शिक्षकाला इयत्ता पहिली ते सातवी अशा सातही वर्गातील जवळपास 33 विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागणार आहे. या शाळेत एकूण चार शिक्षक असून एका महिला शिक्षिकेची बदली झाली आहे. तर अन्य दोन शिक्षक सेवानिवृत्त या महिन्यात होणार आहेत. त्यामुळे आपसूकच एकच शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक या शाळेत एकटेच असणार आहेत. या एका शिक्षकावर सर्व शाळेचा कारभार चालवावा लागणार आहे. ही एकंदरीत परिस्थिती पाहता पालक शिक्षक समिती या सर्व प्रकाराबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत नाराज आहेत. त्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कुणकेरी शाळा नंबर १ मध्ये अपुरी शिक्षक संख्या असल्याने तात्काळ येत्या नव्या शैक्षणिक वर्षात दोन तरी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणी शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत सावंत यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती