चांगल्या उत्पादन पद्धतीच्या पडताळणीसाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे औषध उत्पादकांची तपासणी

मंगळवार, 12 एप्रिल 2022 (21:32 IST)
अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे राज्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम, १९४५ ची अंमलबजावणी केली जाते. या कायद्याअंतर्गत राज्यात औषधे, सौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन व विक्री यांचे नियमन केले जाते. औषधे उत्पादकांना मंजूर परवान्याअंतर्गत उत्पादन करतांना औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमातील अनुसूची M अन्वये विहित करण्यात आलेल्या चांगल्या उत्पादन पद्धतीचे पालन करून गुणवत्तापूर्ण औषधे उत्पादन करणे बंधनकारक आहे.
 
राज्यात ॲलोपॅथिक औषधे उत्पादन करणाऱ्या उत्पादक आस्थापना अनुसूची M चे  अनुपालन करून औषधे उत्पादन करतात याची पडताळणी प्रशासनाच्या औषध निरीक्षकांद्वारे  नियमित तपासण्याद्वारे करण्यात येते. माहे जानेवारी, २०२२ ते मार्च, २०२२ या कालावधीत राज्यातील सर्व विभागात ॲलोपॅथिक औषधे उत्पादकांचा तपासणी कार्यक्रम राबविण्यात आला. या कालावधीत राज्यातील कोंकण विभाग ३६६, बृहन्मुंबई ५२, पुणे विभाग १०४, नाशिक विभाग ४३, औरंगाबाद विभाग ४७, नागपूर  विभाग २२ व अमरावती विभाग २१ अशा एकूण ६५५ उत्पादकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या तपासणी मोहिमेत ९५ उत्पादकांना अनुसूची M अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहेत. एकूण १६ प्रकरणात गंभीर दोष आढळून आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती