इंदुरीकर महाराज : 'माझे व्हीडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांचं वाटोळं होईल'
मंगळवार, 8 मार्च 2022 (17:29 IST)
माझे व्हीडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांचं वाटोळं होईल, असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं. असं वक्तव्य करणारा त्यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
"4 हजार युट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर. माझ्यावर पैसे कमावले, क्पिला माझ्यावरच तयार केल्या. यांच वटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही. (विचित्र हावभाव करत) क्लिपा दाखवणाऱ्यांना असं पोरगं जन्माला येईल," असं व्हायरल झालेल्या व्हीडिओत इंदुरीकर महाराज म्हणताना दिसत आहेत.
इंदुरीकर महाराजांचे अनेक व्हीडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ज्यांना लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत.
इंदुरीकर महाराजांनी 'त्या' वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी
"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते," या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
आपल्या वाक्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं, एक पत्रक काढून इंदुरीकर यांनी म्हटलं आहे.
याआधी मात्र इंदोरीकर यांनी वेगळंच स्पष्टीकरण दिलं होतं.
"दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. भागवत, ज्ञानेश्वरी सगळीकडे ते नमूद केलं आहे. पण या वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस वाट बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन," असं स्पष्टीकरण इंदुरीकरांनी दिलं होतं.
इंदुरीकरांच्या वक्तव्याचं त्यांच्या पाठीराख्यांनी समर्थन केलं आहे, तर अनेक महिला राजकीय नेत्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हणाल्या, "पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवली जाणं दुर्दैवी आहे. कीर्तनकारांबद्दल माझ्या मनात सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही.
"यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलोय. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणं दुर्दैवी आहे."
इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून स्त्री जन्माचा विचार रुजवायला हवा, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या.
"इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून महिला-मुलींवर अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य करतात. मात्र, त्यांनी कीर्तनातून स्त्री जन्माचा विचार रुजवायला हवा. स्त्रियांचा आदर करायला शिकवायला हवं. टीका झाली म्हणून त्यांनी कीर्तन सोडण्याची गरज नाही," असं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
त्या म्हणाल्या, "आपल्या समाजात काही विघ्नसंतुष्ट, विकृत लोक असतात. असा त्रास देऊन माणूस आतून संपवण्याचा त्यांचा घाट असतो. पण, महाराज तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही आपल्यासोबत आहोत. समाजात तिढा निर्माण करणारी लोक समाजच स्वीकारत नाही. आपण जे दाखले दिले ते पुरव्यनिशी दिले. त्यामुळे आपण मानसिक खच्ची होऊ देऊ नये."
राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही इंदुरीकरांना खचून न जाण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांनी ट्वीट केलंय की, "महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. आपल्या समाजात काही विकृत लोक असतात, जे आपल्याला आतुन संपवण्याचा प्रयत्न करतात. आपण खूप हळवे आहात, त्यामुळे खचून जाऊ नका आपल्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे.