अलीकडे ते म्हणाले की मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,. असे वक्तव्य इंदुरीकर यांनी कीर्तनातून करून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
देसाई यांनी म्हटले की करोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट येत आहे. याआधी अनेक जणांना करोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच, असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत, असा आरोप देसाई यांनी केला आहे.
यासंबंधी इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकारचे प्रतिनिधीसुद्धा सामील आहेत असे जनतेला वाटेल, असे देसाई यांनी म्हटले आहे.