बांगलादेश मुक्तीलढ्यात पंतप्रधानांना कोणत्या जेलमध्ये ठेवलं होतं?’; जयंत पाटील

मंगळवार, 30 मार्च 2021 (08:27 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी बांगलादेश दौरा केला. त्या दरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं, ज्यावरून आता विरोधी पक्षाने त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात मी सहभागी झालो होतो. तसेच तेव्हा मी 20- 22 वर्षांचा असेल. असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं, त्याबरोबरच माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. तेव्हा मलाही अटक झाली होती, आणि माझ्या आयुष्यातील ते माझं पहिलं आंदोलन असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी मोंदींच्या या वक्तव्यावरून त्यांना उपरोधिक चिमटा काढत एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये ते पंतप्रधानांवर टीका करत असल्याचं दिसुन येत आहे. ‘आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा’ असं सुरूवातीला लिहुन नंतर त्यांनी पंतप्रधानांवर सडकुन टिका केली आहे, तसेच आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी बांगलादेश मुक्तीलढ्यात झालेल्या अटकेचे पुरावे देण्याचीही मागणी त्यांनी केली.
 
‘आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपल्या पंतप्रधानांना बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाली, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते? याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल.” राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करून अशाप्रकारे मोदींवर टिका करत असा प्रश्न उपस्थित केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती