काँग्रेसच्या बैठकीत विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा तुफान राडा!

गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (19:41 IST)
शिवसेना आणि राष्ट्रवादीत वर्चस्वासाठी वाद सुरू असतानाच आता काँग्रेसमधील अंतर्गद संघर्ष चव्हाट्यावर आल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसची  नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान बैठकीत माईकवर बोलण्यावरून चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी वादाचे रूपांतर राड्यात झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
नागपूर शहर काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी महत्वाचा आढावा घेण्यात येणार होता. नागपूरच्या सहा मतदार संघांचा आढावा या ठिकणी घेतला जाणार होता. पण भाषण करण्यावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला.
 
विदर्भातील दोन काँग्रेस नेत्यांच्या समर्थकांनी बैठकीत जोरदार वाद घालत एकमेकांना धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या दिशेने धावून जात एकमेकांना धक्काबुक्की केली आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह नागपूर जिल्ह्यांतील आमदारांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना असभ्य भाषा वापरत आवाज चढवला. त्यानंतर बैठकीतले त्यांचे समर्थकही आक्रमक झाले. दोन्ही नेते वाद घालत असतानाच त्यांचे समर्थक एकमेकांवर धावून आले. सुदैवाने उपस्थित नेत्यांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती