१२ वर्ष रखडलेल्या कोकण रेल्वे विभाग टर्मिनसच काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अटळ !

बुधवार, 17 मे 2023 (08:31 IST)
सावंतवाडी स्टेशनचा कोकण रेल्वे विभागात टर्मिनस असा उल्लेख असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्याने प्रवास करणाऱ्या कोकणवासिय चाकरमन्यांना याचा काहीच फायदा होत नाही. परिणामी याचा फायदा दक्षिणेतील गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यांना झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी टर्मिनसला कोणत्या सुविधा दिलेल्या आहेत ते लेखी स्वरूपात कळवावे व सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी स्टेशन मास्तर यांच्याकडे करण्यात आली. तर १२ वर्ष रखडलेल्या टर्मिनसच काम २०२४ पर्यंत पुर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिला.
 
याबाबतच निवेदन सावंतवाडी स्टेशन मास्तर यांना संघटनेच्या माध्यमातून देण्यात आल. यावेळी अध्यक्ष शांताराम नाईक म्हणाले, अनेक वर्ष अर्ज, विनंत्या करून त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. १२ वर्ष रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसच काम २०२४ पर्यंत पुर्ण न झाल्यास कोकण रेल्वे कार्पोरेशन ते मंत्रालयावर मोर्चा काढणार, याच नेतृत्व मी करणार असा इशारा त्यांनी दिला. तर सेक्रेटरी यशवंत जडयार म्हणाले, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सुसज्ज अस सावंतवाडी टर्मिनस व्हावं अशी आग्रही मागणी केली आहे. कोकण रेल्वेला २५ वर्ष होत असताना याचा लाभ दुर्देवाने कोकणवासीयांना झालेला नाही. याउलट दक्षिणेतील राज्यांना या सुपरफास्ट गाड्यांचा फायदा अधिक होत आहे.

कोकण रेल्वे व रेल्वे बोर्डाकडे पॅसेंजर गाड्या व स्लो दर्जाच्या गाड्यांची मागणी केली आहे. कोकणातील प्रत्येक स्थानकावर त्या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. तर सावंतवाडी टर्मिनस मार्गी लागल्यास रेल्वे प्रवाशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे सावंतवाडी टर्मीनस सुरू होऊन कोकणातील भुमिपुत्रांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती