राजकारणात आलो नसतो तर लष्करात असतो – एकनाथ शिंदे

शनिवार, 6 मे 2023 (08:50 IST)
"आपण जर राजकारणात आलो नसतो तर लष्करात देशाची सेवा करत असतो", असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
 
"आपलं लष्करात सिलेक्शन झालं होतं. पण प्रशिक्षणासाठी जात असताना मित्राच्या बहिणीच्या लग्नाला हरयाणाला गेलो. पण नंतर आपल्याला लष्करात घेण्यात आलं नाही", असं शिंदेंनी सांगितलं.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पिता-पुत्र काल (5 मे) एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही आठवण सांगितली.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं. लखनऊला त्यासाठी ट्रेनिंगला जायचं होतं. माझा एक मित्र होता हरी परमार नावाचा. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याने मला आमंत्रण दिलं होतं आणि त्याला आपण येणार असल्याचं सांगितलं होतं. मग लखनऊला जाताना अचानक ते आठवलं आणि आपण ट्रेन बदलली. दिल्लीला जाऊन तिथून हरियाणातील रोहतकला लग्नाला गेलो.”
 
“लग्न झाल्यानंतर दोन-चार दिवसानंतर मी लखनऊमधील ट्रेनिंग सेंटरला गेलो. पण आर्मीवाल्यांनी आपल्याला घेतलं नाही. पुन्हा नवीन वॉरंट आणण्यासाठी पाठवलं. मग परत इकडे आलो. तर त्यावेळी आपल्याकडे दंगल सुरू होती. आर्मीमध्ये सैनिक झालो नाही तरी शिवसैनिक मात्र झालो,” असं शिंदे यांनी म्हटलं.
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती