तृतीयपंथी हा एक सामाजिक घटक असून, त्यांच्याही हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली आहे.योजना राबविण्यासाठी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तृतीयंपथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत नाशिक विभागातील पाच ही जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाचे सदस्य सचिव तथा नाशिक समाज कल्याण विभागचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार, यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (National Portal For Transgender Persons) किंवा https://transgender.dosje.gov.in/Applicant/Login/Index या लिंक वर भेट देऊन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही,आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावीत, असेही भगवान वीर यांनी सांगितले आहे.