शिवसेना कोणाची हे कसं ठरवणार? निवडणूक आयुक्तांनी सांगितलं...
बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (14:59 IST)
सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नवं वळण आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कालच्या घडामोडींवर निवडणूक आयोगानेही प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देणे किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर निर्णय देताना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल,' असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
"निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे आणि या प्रकरणातही आयोगाकडून ती प्रक्रिया केली जाईल," असं ते म्हणाले.
राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे. शिवसेनेच्या प्रकरणातही संघटनेतील बहुमताची चाचपणी करून आम्ही निर्णय घेऊ,' असंही ते पुढे म्हणाले.