हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू

सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:10 IST)
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा नागपूरच्या  ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर ती अपयशी ठरली.
 
रविवारी रात्रीपासूनच नाहीतर तिची प्रकृती हळुहळु खालावतच होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिचा रक्तदाब वाढवण्यासाठी औषध दिली जात होती. मात्र, तिचा रक्तदाब रोज कमीजास्त होत होता. रात्रीपासून तिचा रक्तदाब अत्यंत खालवला होता. औषधांना देखील ती प्रतिसाद देत नव्हती. सकाळी तिचं हृदय दोनदा बंद पडलं होतं. एकदा आम्ही ते हृदय पुन्हा सुरू करू शकलो. परंतु दुसऱ्यावेळी मात्र आम्ही ते सुरू करू शकलो नाही. अखेर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी आम्ही तिला मृत घोषित केलं. आम्ही आमच्यापरीने होईल तेवढे सर्व प्रयत्न केले. तिच्या जखमा अतिशय खोल होत्या. अशी माहिती डॉक्टर दर्शन रेवनवार यांनी दिली.  
 
हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती