चोरीच्या संशयावरून चिमुकल्याला अमानुष शिक्षा, नग्न करून गरम टाईल्सवर बसवलं
- नीतेश राऊत
पाच वर्षांच्या एका दलित मुलावर मंदिरात चोरी केल्याचा संशय घेण्यात आला. त्यासाठी त्याला नग्न करून गरम टाईल्सवर बसवण्याची शिक्षा दिल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे.
या शिक्षेमुळे चिमुकल्याचा पार्श्वभाग चांगलाच भाजला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल ढोरेला अटक करून त्याच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट आणि बाल संरक्षण अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय अनुसूचित आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
आरोपी अमोल ढोरे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी दारूविक्रीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे.
पीडित मुलगा हा अनुसूचित जातीचा आहे. दुपारच्या वेळी तो मंदिरात चोरीच्या उद्देशाने आला, म्हणून आरोपीने त्याला मारहाण केली असल्याचं आर्वी पोलीस स्टेशन डायरीवर हजर पोलिसांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
आर्वी शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डामधील जोगना माता मंदिर परिसरात दुपारी शांतता असते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दिलीप पोटफोडे सांगतात, की हे मंदिर फारसे काही प्रसिद्ध नाही. वटपौर्णिमा सोडल्यास मातेच्या दर्शनाला मंदिरात फार कुणी जात नाही. फक्त वडाच्या झाडामुळे वटपौर्णिमेला तिकडे गर्दी होते.
"अन्य दिवशी सट्टा आणि जुगार खेळणारेच जास्त असतात. मंदिराच्या बाजूला वडाच्या झाडाखाली जुगार खेळला जातो. दारूचा धंदा तसेच सट्टा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. आरोपी ढोरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याचा दारूचा धंदा आहे," असं ते सांगतात.
नेहमीप्रमाणे दुपारी 12 च्या सुमारास हा लहानगा मंदिर परिसरात खेळत होता. मंदिराच्या चव्हाट्यावर आरोपी ढोरे बसून होता. काही कळण्याच्या आतच अमोल ढोरेने त्याला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली.
त्यानंतर त्याने या मुलाला नग्न केलं आणि 45 अंश सेल्सियसच्या रणरणत्या उन्हात मंदिराच्या गरम टाईल्सवर बसवलं. यामध्ये त्याचा पार्श्वभाग गंभीररीत्या भाजला.
जखमी चिमुकला घरी पळत गेला आणि आईजवळ रडू लागला. गंभीर दुखापत बघून आईलाही धक्काच बसला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गमतीतला प्रकार?
"हा मुलगा रोज दुपारी खेळायला मंदिर परिसरात जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळं त्याने ही शिक्षा दिली असावी," असं अंदाज पोटफोडेंनी व्यक्त केला.
पण जोगना माता मंदिर परिसरात कुठलेच अवैध धंदे चालत नसल्याचं पोलीस तपास अधिकारी परमेश आगासे यांनी सांगितलं. आर्यन हा दररोज मंदिरात जायचा. त्यामुळं प्रकरणात जातीयवाद नसल्याचंही आगासे म्हणाले.
"या मुलानं मंदिरात चोरी केल्याचा संशय आरोपीला आला असावा. त्यातून गमती गमतीमध्ये हा प्रकार घडला," असं आगासे यांनी सांगितलं.
पीडित कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. रोजमजुरी करून कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळं कठोर कारवाईच्या मागणीसाठी अनेक संघटना पुढे सरसावल्या आहेत. भीम टायगर सेनेनं निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
मंदिर परिसरात खेळणाऱ्या मुलांना यापूर्वीही अनेकदा मारहाण करण्यात आली होती. मात्र यावेळी अतिशय निर्दयीपणे मारहाण करून टाईल्सवर बसून चटके देण्यात आले आहेत.