नागपुरात मुसळधार पाऊस, अंबाझरी, गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो जनजीवन विस्कळीत

रविवार, 24 सप्टेंबर 2023 (10:54 IST)
नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (22 सप्टेंबरला) झालेल्या पावसाने हाहा:कार उडवला आहे. सध्या शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून शासनाच्या विविध विभागांमार्फत बचाव कार्य सुरू आहे.
 
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजल्यानंतर विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नागपुरकरांची झोप उडवली. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
 
अंबाझरी, गोरेवाडा हे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जवळच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शहरातील नाग नदी आणि पिवळी नदी दुथडी भरून वाहत आहेत.
 
शहरांच्या अनेक भागात गाड्या वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
आज (23 सप्टेंबर) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 106.7 मिमी इतका पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
 
मुसळधार पावसाने शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य बस स्थानक मोर भवन येथे बसेस पाण्याखाली गेल्या आहेत.
 
शंकर नगर, वर्मा ले आऊट, पडोळे चौक, पंचशील चौक या भागात प्रचंड पाणी साठलं आहे.
 
दरम्यान आज शाळा, कॉलेजांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. कामाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन महापालिकेने केली आहे.
 
नागपुरातील परिस्थितीवर लक्ष - फडणवीस
महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपिन इटणकर, आणि इतर पदाधिकारी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे.
 
“एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.. मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
 
नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे/ अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत.
 
शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे,” ही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 





Published By-Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती