सध्या सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भाग जलमय झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवार सकाळ पासून या भागात पाऊस कोसळत आहे. शहरातील सखल भागात घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घरात दुकानात पावसाचं पाणी शिरले आहे. विद्यार्थ्यांना पावसात गुडघ्याभर पावसातून ये जा करावी लागत आहे. पावसाचा जोर पुढील 2 ते 3 दिवस वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या शहरातील जिल्हाधिकाऱ्याने शाळेला सुट्टी जाहीर केली आहे.
तसेच रायगड जिल्ह्यात देखील पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. महाडमध्ये पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील 3 दिवस मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, कोकणातील अनेक जिल्ह्यात पुढचे 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.