राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच, आतापर्यंत 104 जण पावसाळा बळी पडले

सोमवार, 18 जुलै 2022 (11:23 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी सुरु असून मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला असून 189 जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
 
महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. जुलैमध्ये 15 दिवसांत 392.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, आता येत्या आठवड्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत रविवार ते मंगळवार या कालावधीत जोरदार वारे आणि वादळी वारे वाहतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. 18 जुलै रोजी रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत.आता हवामान विभागाने पावसाबाबत इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो, असे विभागाने म्हटले आहे. येत्या तीन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भागतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती