विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा प्रकोप

शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:45 IST)
विदर्भ आणि मराठवाडा चांगलाच तापला असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तर यावर्षी मध्य महाराष्ट्रातील नागरिकही उष्णतेची लाट काय असते, याचा अनुभव घेत आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरातील कमाल तापमानामध्ये एक अंशाने वाढ झाली असून, मागील दहा वर्षांतील उच्चांक मोडत कमाल तापमानाने तब्बल 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात सर्वाधिक अकोला येथे 46.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
 
एप्रिलच्या अखेरीस दररोज कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होत असल्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील दोन दिवसांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
 
शुक्रवारी (दि. 26) मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील कमाल तापमान 44 अंशापर्यंत गेले असून, सर्वाधिक अहमदनगर येथे 44.9 अंश सेल्सिअस तर सोलापूर येथे 44.3 आणि जळगाव येथे 44.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातही 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, एप्रिल महिन्यातील हा उच्चांक आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानामध्ये आणखीन वाढ होईल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविल्यामुळे यंदाचा उन्हाळा “पक्का घाम’ काढणार, असे दिसते.
 
राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये ) 
अकोला 46.4, ब्रह्मपुरी 45.8, परभणी आणि वर्धा 45.7, चंद्रपूर 45.6, अमरावती 45.4, नागपूर 45.2, अहमदनगर 44.9, नांदेड आणि यवतमाळ 44.5, जळगाव 44.4, सोलापूर 44.3, बीड आणि वाशिम 44.2, उस्मानाबाद आणि गोंदिया 43.8, माळेगाव 43.2, बुलढाणा 43.1, सांगली आणि औरंगाबाद 43, पुणे 42.6, नाशिक 41.7, सातारा 41.6, कोल्हापूर 41. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती