राष्ट्रवादीतील वादाची आता 29 ला सुनावणी

शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (08:13 IST)
राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा वाद आता निवडणूक आयोगात रंगला आहे. आज निवडणूक आयोगात सुनावणी संपली असून पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. शरद पवार यांच्या गटाकडून देवदत्त कामत यांनी आज युक्तीवाद केला. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे कामत यांनी सांगितले. यानंतर अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी शरद पवार गट काही न पाहता बोलत आहे. ४० पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत नाहीत. त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यांचा एकमात्र हेतू हे प्रकरण लांबविणे आहे, असे म्हटले.
 
शरद पवार गटाने आज १९९९ पासून संपूर्ण इतिहास निवडणूक आयोगात मांडला. मात्र, अजित पवार गट दोन मुद्यावर ठाम आहे. ते म्हणजे ४० आमदारांचा पाठिंबा आणि बहुमत. अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी म्हणाले की, १९९९ पासून एक पक्ष निर्माण केला, विस्तार झाला तो फक्त शरद पवार यांच्यामुळे. यांना सर्वांनी सहमतीने अध्यक्ष स्विकारले. कधीही कोणताही आरोप २० वर्षात झाला नाही. त्यामुळे आता वाद निर्माण करता येत नाही.
 
अनुच्छेद १५ चा दिला दाखला
मनु सिंघवी यांनी अनुच्छेद १५ चा दाखला देत निवडणूक आयोगावरदेखील प्रश्न उपस्थित केले. अनुच्छेद १५ पक्षात आधीपासून वाद पाहिजेत. वेळेवर वाद निर्माण करुन याचिका दाखल करता येत नाही. तसेच निवडणूक आयोगाला कार्यवाही करता येत नाही, असे मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती