अजित पवार : 'लपून भेटलो नाही' ते ‘राजकीय अर्थ काढू नका’

बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (07:32 IST)
ANI
शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटींमुळे सध्या महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलंय. शरद पवारांच्या भूमिकेत अद्याप स्पष्टता दिसत नसल्यानं या चर्चांना जोरही चढला आहे.
 
पवार काका-पुतण्यांच्या भेटींचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ लावत आहेत. कुणी या भेटींकडे ‘पवार स्टाईल’ म्हणून पाहतंय, तर कुणी ‘कौटुंबिक भेट’ असल्याचं म्हणतंय.
 
या भेटींनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना भूमिका बोलून दाखवताना दिसतायत. मात्र, तरीही एका पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केलेलं विधान अनेकांच्या भुवया उंचवणारं आहे. शरद पवार म्हणाले की, “काही हितचिंतकांकडून आमचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय.”
 
तर दुसरीकडे, अजित पवार यांनी पुण्यात चोराडियांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत कोल्हापूर दौऱ्यावर असताना म्हटलं की, “फार काही वेगळं घडलंय असं समजण्याचं कारण नाही.”
 
अजित पवार पुढे म्हणाले की, “इथून पुढे मी आणि शरद पवार पवार एकमेकांना भेटलो, तर त्या भेटींना 'कौटुंबिक भेट' समजावी.”
 
यावेळी अजित पवारांना पत्रकारांनी जेव्हा विचारलं की, “तुम्ही लपून भेट का घेतली?” त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी म्हटलं की, “मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता असून मी अशी कुठेही लपून भेट घेतली नाही.”
 
शरद पवार आणि अजित पवार यांची भेट ज्या ठिकाणी झाली, त्या भेटीच्या ठिकाणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रश्न उपस्थित केले होते.
 
राज ठाकरे म्हणाले की, “पवारांना भेटायला 'चोरडिया' नावाच्या माणसाचं घरंच नेमकं कसं सापडतं?”
 
राज ठाकरेंच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले की, “चोरडिया कुटुंबाचे आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. चोरडिया यांचे वडील पवार साहेबांचे वर्गमित्र होते. आम्हा दोघांना त्यांचं घर हे भेटण्यासाठी सोयीचं होतं म्हणून आम्ही तिथे भेटलो.”
 
तसंच, अजित पवार म्हणाले की, “आम्ही दोघे इथून पुढे दिवाळी, दसरा किंवा इतर कोणत्याही सणाला भेटलो, तर त्या भेटीला कौटुंबिक भेटच समजावी. त्यातून वेगळे अर्थ काढण्याची काहीच गरज नाही.”
 
‘अजित पवार त्यांची अस्वस्थता लपवतायेत’
मात्र, कौटुंबिक भेटीचं कारण पुढे करत अजित पवार त्यांची अस्वस्थता लपवत आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
 
अजित पवार आणि शरद पवार यांच्या सद्यस्थितीतील भूमिकेबाबत बोलताना वरिष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणतात की, "एकीकडे शरद पवार त्यांच्या भाजपविरोधी भूमिकेवर ठाम असताना, अजित पवारांची अस्वस्थता वाढत चालली आहे. शरद पवारांनी राज्यभर दौऱ्यांची घोषणा केलीय. छगन भुजबळांच्या मतदारसंघात त्यांनी घेतलेल्या सभेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता अजित पवारांना त्यांचं राजकीय भविष्य धोक्यात दिसू लागलेलं आहे.
 
"त्यामुळे येनकेन प्रकारे शरद पवारांना सोबत घेऊन येण्यासाठी अजित पवारांच्याकडून अशा 'कौटुंबिक भेटी' घेतल्या जात आहेत. शरद पवारांना भाजपसोबत आणण्यासाठी मोदी आणि अमित शाह हेदेखील इच्छुक असून त्यामुळेच कदाचित केंद्राकडून वेगवेगळ्या 'ऑफर्स' आल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत केलेलं वक्तव्य तपासावं."
 
अद्वैत मेहता पुढे म्हणाले की, “उद्योजकाच्या घरी शरद पवारांची घेतलेली ही भेट 'कौटुंबिक' असल्याचं जरी अजित पवार म्हणत असले, तरी अजित पवारांची एकूणच बॉडी लँग्वेज, पत्रकारांवर खेकसणं आणि इतर प्रकार पाहता अजित पवार दिवसेंदिवस निराश होत चालल्याचं दिसतंय. दुसरीकडे शरद पवारांचं वय, ते घेत असलेल्या सभा आणि त्यांचे देशभर असलेले संबंध पाहता जनतेच्या मनात शरद पवारांच्याविषयी सहानुभूती तयार होताना दिसतेय.”
 
यावेळी अद्वैत मेहतांनी शरद पवारांच्या भूमिकेबाबतही आपलं मत बीबीसी मराठीसोबत बोलताना मांडलं.
 
ते म्हणाले, “मुंबईत होऊ घातलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं यजमानपद शरद पवारांकडे आहे. त्यामुळे विरोधकांसाठीही त्यांचं महत्त्व मोठं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून इंडिया आघाडीच्या विरोधात फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब केला जातोय. त्यामुळेही शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण केला जातोय. पण खरा संभ्रम अजित पवारांच्याच मनात असल्याचं पाहायला मिळतंय."
 
राजकीय भेटींना ‘कौटुंबिक’ मुलामा – संजीव उन्हाळे
पवार काका-पुतण्याच्या भेटींच्या राजकीय अर्थांबाबत बीबीसी मराठीनं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्याशीही बातचित केली.
 
संजीव उन्हाळे म्हणाले, “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार आणि शरद पवार फक्त जेवणासाठी भेटले, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबत दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रम दिसून येतोय आणि तो दूर करण्यासाठी हे दोन्ही प्रमुख नेते एकमेकांना भेटले असावेत."
 
उन्हाळे पुढे म्हणाले की, “अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असून भाजपने दिलेलं पद त्यांना सुखावह वाटत आहे. सत्तेत आल्यामुळे त्यांच्या मागे असणाऱ्या चौकशा आणि इतर गोष्टींचं शुक्लकाष्ठ सुटलंय. शरद पवार मात्र भाजपच्या विरोधात कडवी भूमिका घेत आहेत.
 
या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना समांतर भूमिका घेतलीय. त्यामुळे या भेटीमधून यापैकी एखादा नेता माघार घेऊ शकतो का? याची चाचपणी करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र यातून साध्य काय होत नाहीये म्हणून हा 'कौटुंबिक भेटीं'चा मुलामा दिला जातोय."
 
या पवार काका-पुतण्यांच्या भेटींचे भविष्यकालीन राजकीय अर्थही संजीव उन्हाळेंनी सांगितले.
 
ते म्हणाले की, “2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्ष एकतर संपतील किंवा नव्याने उभे राहतील. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाचं धोरण पाहता त्यांना इतर कोणताही पक्ष देशात उभा राहिलेला नको आहे त्यामुळे शरद पवारांना कमकुवत करण्यासाठी या भेटींची खेळी खेळली जात आहे का? हेदेखील तपासणी तितकंच महत्त्वाचं असणार आहे."
 
तसंच, "सध्या राज्यात किंवा देशात ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातंय ते सर्वसामान्य माणसाला रुचणारं किंवा पचणारं नाहीये. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याचं दिसतंय. अजित पवार आणि भाजप यांच्यासमोर ही सहानुभूती कमी करणं हे मोठं आव्हान असणार आहे," असंही उन्हाळे म्हणाले.
 
अजित पवार आणि शरद पवार हे जरी काकापुतणे असले तरी त्यांच्या सध्याच्या भेटीगाठींकडे फक्त काकापुतण्याची भेट म्हणून पाहाणं चुकीचं ठरेलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर या भेटी होत आहेत. पक्षावर वर्चस्व कुणाचं यावरून सध्या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
 
ज्यावेळेला नेते सार्वजनिक जीवनात वावरतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलाकडे राजकीय चाल म्हणूनच पाहिलं जातं.
 
आताच्या स्थितीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्यच टांगणीला आहे. कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत ‘या पुढच्या आमच्या भेटी कौटुंबिक भेटच समजाव्यात त्यातून वेगळे अर्थ काढू नका’ असं म्हणून अजित पवार वेळ तर मारून नेऊ शकतात. पण त्यातून राजकीय अर्थ काढण्यापासून कुणालाच थांबवू शकणार नाहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती