शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मंगळवार, 10 जानेवारी 2023 (08:12 IST)
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची आज, 10 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगात परीक्षा पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोनही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे.
 
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती.
 
या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
 
आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती