पाय घसरून पडलेल्या लहान भावाला वाचवायला गेला अन् तोही बुडाला

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (21:00 IST)
येवला तालुक्यातील उंदीरवाडी वासियांसाठी काळा दिवस ठरला असून नदीच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत आई थोडक्यात बचावली आहे.
 
अधिक माहिती अशी की उंदीरवाडी येथील भाऊसाहेब जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव या आपल्या दोन मुलांसह कपडे धुण्यासाठी नारंगी नदीतीरी गेल्या होत्या. अचानक पणे लहान मुलगा गौरव जाधव याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी स्वप्निल या मोठ्या भावाने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. हे पाहून आईने देखील पाण्यामध्ये उडी घेतली मात्र आईलाही पोहता येत नसल्यामुळे आई पाण्यात बुडू लागली.
 
हे दृश्य शेजारील काही शेतकऱ्यांनी पाहिले असता त्यांनी चराट फेकून आईला वर काढले मात्र उशीर अधिक झाल्यामुळे दोन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे येवला तालुका हळहळला असून मृतदेह शवविचछेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती