नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय का?

शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (10:49 IST)
"आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे. मुंबई शहराला सर्वोत्तम बनवण्यात या कामांची मोठी भूमिका असणार आहे," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन केलं.
 
"महाराष्ट्राचा विचार केल्यास आगामी 25 वर्षांत महाराष्ट्रातील अनेक शहरं भारताच्या प्रगतीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्यामुळे मुंबईला भविष्य काळासाठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही काळ याचा वेग मंदावला होता. पण शिंदे-फडणवीस जोडी येताच कामाचा वेग पुन्हा वाढला," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (19 जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पंतप्रधांनीनी म्हटलं की, "मुंबईच्या विकासात स्थानिक महापालिकेची भूमिका मोठी आहे. बजेटची कोणतीही कमतरता नाही. पण विकासासाठीचा पैसा योग्य कामात लागला पाहिजे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, पैसा बँकेतच पडून राहिला, तर विकासासाठी शहर तडफडत राहील. ही स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्वीकारार्ह नाही. मुंबई विकासापासून वंचित राहील, हे कदापि शक्य नाही."
 
“भाजप किंवा एनडीएचं सरकार विकासाच्या आड राजकारण कधीच आणत नाही. पण मुंबईत राजकीय स्वार्थासाठी असं अनेकदा होताना आम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत उत्तम ताळमेळ असलेली व्यवस्था असणं गरजेचं आहे.”
 
पंतप्रधानांना या विधानांमधून नेमकं काय सूचित करायचं होतं? डबल इंजिन की सरकार म्हणताना त्यांना नेमके काय राजकीय अर्थ अभिप्रेत होते? या उद्घाटनाच्या कार्यक्रमामागे कोणते राजकीय अर्थ दडलेत का? भाजपाने आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिंदें गटाने म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय का? असे अनेक प्रश्न या भाषणानंतर उपस्थित होत आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीची नांदी
मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा ध्वज झेंडा फडकणार त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.
 
भाजपाने या निवडणुकीसाठी पहिल्यापासूनच कंबर कसली होती. आता त्यांना असं वाटतंय की शिंदे गट सोबत आल्यानंतर आपलं महानगरपालिकेचं स्वप्न जास्त जवळ आलंय. कारण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.
 
पण आता पुढे काय होणार ?
म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी सुरू आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागच्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये होणं अपेक्षित होतं. या गोष्टीला येत्या फेब्रुवारी मध्ये एक वर्ष पूर्ण होईल.
 
त्यामुळे भाजपने या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधानांना मुंबईत बोलवून प्रचाराचा नारळ फोडलाय असं जर म्हणायचं असेल, तर महानगरपालिकांच्या निवडणुका या आता जवळ आल्यात असं म्हणायला हरकत नाही.
 
कदाचित न्यायालयाचा निकालही आता येईल. हे निकाल आल्यानंतर या निवडणुका मे- जून मध्ये होऊ शकतात. पण याच दरम्यान पावसाळा सुरू होईल.
 
मागच्या वेळेस न्यायालयाने म्हटलं होतं की, पावसाळ्यात निवडणुका घेणं अवघड असतं. मग या निवडणुका परत ऑक्टोबर- नोव्हेंबर पर्यंत पुढे सरकतील का? असा सगळा प्रश्न आहे.
 
त्यानंतर अवघ्या सहा सात महिन्यांमध्येच लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजतील. त्यामुळे या सगळ्या प्रकारात महानगरपालिकेची निवडणुक कधी होणार हा प्रश्न आहे.

‘डबल इंजिन सरकार’चा वारंवार उल्लेख
आता निवडणूक कधी होणार हा मुद्दा जर बाजूला ठेवला आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने जी राजकीय विधानं करण्यात आली आहेत यांच्याकडे एक कटाक्ष टाकला तरी यातून हेच स्पष्ट होतंय की भाजपला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे वेध लागलेत.
 
महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं सरकार काय करतंय हे सांगितलं. स्वतःच्या सरकारचे प्रयोग, प्रकल्प, नवीन काय सुरू आहे हे त्यांनी या भाषणांमध्ये वारंवार सांगितलं.
 
मुंबई महानगरपालिका आणि मुंबईत असलेली सभा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांशी मराठीत बोलायला सुरुवात केली. त्याचबरोबर भारताचा जो विकास यापूर्वी कधी कोणी पाहिला नव्हता तो भाजपने केलाय असा दावा त्यांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदेंनी त्यांचा दावोस मधील अनुभव सांगितला. या अनुभवातून एक धागा घेत मोदी म्हणाले की, "भारतात विकासाच्या गोष्टी घडू लागल्या आहेत. भारताच्या विकासाकडे संपूर्ण देश आणि जग डोळे लावून बसलेत. या सगळ्यांमध्ये शहरांचा विकास हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो शहरांचा विकास आम्ही करतोय.
 
आमच्या सरकारने देशभरात मेट्रोचा जाळं उभं केलंय, रेल्वेचं आधुनिकीकरण करायचा जो प्रयत्न सुरू केलाय त्यामुळे शहरं हीच विकासाचं इंजिन असणार आहेत.
 
मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं नुकसान झालं. कारण त्या सरकारच्या काळात विविध योजना आणि प्रकल्प यांच्यात अडथळे निर्माण करण्याचं काम झालं."
 
आता मात्र विकासाला पुन्हा गती आली आहे. कारण शिंदे फडणवीसांचं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राल मिळालं आहे आता हा विकासाला गती मिळाली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
 
त्यांच्या या डबल इंजिनच्या उल्लेखावरून साहजिकच त्यांचं लक्ष मुंबईसारख्या महानगरपालिकेकडे आहे असं दिसतंय.
मुंबईवर सत्ता हवी यासाठी भाजपचे अनेक वर्षापासूनचे प्रयत्न आहेत. शिवसेनेसोबत ते युतीमध्ये होते, मागच्या निवडणुकीमध्ये भाजप 82 जागांपर्यंत पोहोचलं होतं. पण तरीही सत्ता शिवसेनेकडे गेली. यावेळी भाजपला या महानगरपालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचायच आहे.
 
शहरं आणि शहरांचा विकास यासाठी राज्य केंद्राच्या माध्यमातून काय प्रयत्न करत आहे हे सांगणं पंतप्रधानांना आवश्यक वाटलं असावं म्हणूनच शहरांचं महत्त्व आणि मुंबई किती महत्त्वाची आहे हे सांगत असतानाच शहरांच्याच विकासाकडे आमचं लक्ष आहे हे त्यांनी वारंवार सांगितलं.
 
2014 ची आणि 2019 ची निवडणूक झाली. भाजपचं सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर ज्या कुठल्याही राज्यात निवडणूक असेल तिथल्या निवडणुकांचा प्रचारात त्यांनी ‘डबल इंजिन’चा उल्लेख केला. त्याचा त्यांना बऱ्याच राज्यांमध्ये फायदा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यात तिथं तिथं प्रचार करताना मोजींनी ‘डबल इंजिन’ सरकारचा उल्लेख केलाय.
 
थोडक्यात, केंद्रात आणि राज्यात जर एकाच पक्षाचं सरकार असेल तर विकास लवकर होतो असं त्यांचं म्हणणं आहे.
पुढे जाऊन नरेंद्र मोदी असंही म्हणाले की,स्थानिक पातळीवर जर समान व्हिजन नसेल तर विकास स्लो होतो. त्याला वेग येत नाही, प्रगती होत नाही. त्यामुळे इथं स्पष्ट दिसतंय की त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर आहे.
 
"मुंबईला भविष्यातल्या विकासासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. 2014 पर्यंत मुंबईत 10-11 किमी मेट्रो चालत होती. मात्र जेव्हा डबल इंजिन सरकार आलं तेव्हा या कामाला गती मिळाली. मधल्या काळात थोडा ब्रेक लागला होता. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या कामांना पुन्हा गती मिळाली आहे," असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
 
मोदींनी भाषणाच्या शेवटी छोट्या उद्योगांना लोन देण्याचा मुद्दा उपस्थित केला. छोट्या उद्योगाविषयी ते म्हणाले की, अनेकांना वाटलं की हे लोक डिजिटल पेमेंट काय करणार, हे लोक या नवीन अर्थव्यवस्थेत कसे येणार, पण तेसुद्धा आले.
 
त्यामुळे मोदींचा रोख नेमका कोणाकडे होता हे सरळ सरळ दिसून येत होतं. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं नाव न घेता निशाणा साधला.
 
'हा मुंबई महापालिकेचा टीझर मानता येईल'
मोदींच्या या भाषणाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटलं," मोदींनी एक गोष्ट स्पष्ट केली की,इथं केवळ डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे. म्हणजे महानगरपालिकेतही समान सरकार हवं असा त्यांचा रोख आहे.
 
याचा अर्थ भाजपाला मुंबईच्या महानगरपालिकेत आणा. हे सरळ राजकीय आवाहन होतं. जर केंद्र, राज्य आणि महानगरपालिका इथं समान पक्षांचं सरकार असेल तर कामं अधिक वेगानं होतील, असं त्यांचं म्हणणं होतं. मोदींनी मुंबईतल्या मतदारांना असं स्पष्ट सांगितलं."
 
"अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती राजकीय स्थैर्याबद्दल होती. त्यांनी वारंवार शिंदे- फडणवीस यांच्या जोडीचा आणि त्यांच्या कामाच्या गतीचा वारंवार उल्लेख केला. याचा अर्थ असा आहे की त्या दोघांचं नेतृत्व कायम असेल. मधल्या काही काळात या सरकारबद्दल, त्याच्या नेतृत्वाबद्दल काही अफवा येत होत्या. त्याच्यावर मोदींनी पूर्णविराम लावला. हे दोघे कायम असतील असा स्पष्ट संदेश होता."
 
सूर्यवंशी यांनी पुढे म्हटलं, "मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजवर कधी बोललं गेलं नव्हतं ते मोदींनी म्हटलं. ते फेरीवाल्यांबद्दल बोलले. याकडे एका नजरेनं पाहता येईल, ते म्हणजे हे फेरीवाले बहुतांश परप्रांतिय असतात. शिवाय त्यांना हटवण्याबद्दलच कायम बोललं गेलं आहे. इथे मोदी त्यांच्या कर्जाबद्दल बोलले. याचा महापालिका निवडणुकीत परिणाम अपेक्षित आहे."
 
"मोदींच्या आजच्या भाषणावरुन वाटतं की हा मुंबई महापालिका निवडणुकीचा टीझर मानता येईल. मोदींनी प्रखर टीका केली नसली तरीही कामाची गती गेल्या सरकारच्या काळात कमी झाली म्हणून डिवचलं आहेच. याचा अर्थ पुढे निवडणुकीच्या काळात हाय व्होल्टेज ड्रामा होणार."
 
'भव्यतेनं लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला'
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं, "एकनाथ शिंदे आणि नंतर नरेंद्र मोदी, दोघांनीही वारंवार मुंबईच्या विकासाला ट्रिपल इंजिनचं सरकार हवं असं सांगून महापालिकेची सत्ता हवी असं स्पष्टच म्हटलं. अनेक नवी योजना आणू असंही मोदी म्हणाले. पण अगोदरच मुंबईत एवढ्या योजना सुरु आहेत, त्यात आता नव्या कोणत्या येणार हे समजत नाही. पण निवडणुकांसाठी भव्यतेनं लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला."
 
"दुसरं म्हणजे, मोदींनी ठाकरेंचं नाव घेतलं नाही पण निशाणा स्पष्ट होता. रोख त्यांच्याकडेच होता. केंद्र सरकारनं पैसा पाठवून तो वापरला गेला नाही त्यामुळे मुंबईचं नुकसान झालं असंही ते म्हणाले आणि आम्ही यापुढे भरपूर पैसा पाठवू कमी, पडणार नाही असंही ते म्हणाले. ही निवडणुकीचीच तयारी आहे," असं नानिवडेकर यांना वाटतं.
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती