भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यात शनिवारी (दि २६) दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, दिल्ली येथील एका पथकाने कारखान्याची तपासणी केली असून हर्षवर्धन पाटील यांच्यासह तिघांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणी माजी मंत्री पाटील यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. दरम्यान, दिल्लीहून इंदापुरात (Indapur) दाखल झालेले पोलिसांचे पथक आज (ता. २७ नोव्हेंबर) परत गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
साखर खरेदी-विक्रीच्या प्रकरणात दिल्लीतील एका कंपनीकडून साखर कारखान्याच्या विरोधात २०१९ मध्ये दावा दाखल केला आहे. त्याच्या सुनावणीसाठी कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित न राहिल्याने दिल्ली पोलिसांचे एक पथक शनिवारी सकाळी साखर कारखान्यात दाखल झाले. कारखान्याच्या कार्यालयात काही काळ चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या पथक कारखान्याच्या काही संचालकांच्या घरीही चौकशी गेले. यावेळी त्यांनी संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने दिलेला धनादेश न वटल्याने सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावा दाखल केला होता. त्या दाव्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २ डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, अन्यथा या सर्वांना फरार घोषित करण्यात येणार आहे.