हनुमान चालिसा: आमच्याशी ठोकशाहीनं वागाल, तर आम्ही तसंच उत्तर देऊ-फडणवीस

सोमवार, 25 एप्रिल 2022 (13:51 IST)
आमच्याशी ठोकशाहीने वागाल तर त्याला तसंच उत्तर दिलं जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. हनुमान चालिसेच्या मुद्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकलं आहे.
 
"राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. परंतु, गेल्या चार-पाच दिवस घटना आम्ही मुंबई-महाराष्ट्रात पाहतोय, त्या पाहिल्यानंतर या सरकारनं संवादासाठी जागा ठेवलीय, असं आम्हाला वाटत नाही. कुणी हिटलरी प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल, तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष बरा, अशा मानसिकतेनं आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय", असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
 
आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांसमक्ष मारहाण करत असतील, तर अशा बैठकांना जाऊन उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले, "सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात जीवे मारण्याचा हल्ला करतात. आम्ही पोलखोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यमातून बीएमसीतील भ्रष्टाचार जनतेसमोर मांडला. लोकशाही यापेक्षा काय करायचं असतं? मात्र, ज्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला.
 
"किरीट सोमय्यांवर ज्या प्रकारे हल्ला झाला, मोहित कंबोजवर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना टार्गेट करून केसेस नोंदवल्या जात आहे. कधी प्रवीण दरेकरांवर केस केले जाते. इतक्या खालच्या स्तराला ही नेतेमंडळी पोहोचलीय. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर आठ खोट्या केसेस केल्या, जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस केल्या. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर चाललाय", असं त्यांनी सांगितलं.
 
गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? मुंबईत जे सुरू आहे, ते मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर चाललं आहे. तिथं जाऊन गृहमंत्री काय करणार आहेत? इतक्या मोठ्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत, मग ही बैठक टाईमपास आहे का? असा सवाल त्यांनी केला.
 
"आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणून असं सांगितलं. तिथं हल्ला किंवा गैरप्रकार करू असं म्हटलं नव्हतं. हनुमान चालिसा म्हणण्यास विरोध, महाराष्ट्रात म्हणायची नाहीतर पाकिस्तानात म्हणायची का?
 
राणा दाम्पत्याला अटक करता आणि पाकिस्तानशी युद्धा जिंकल्यासारखा जल्लोष करता.
 
एसटीच्या संपकरी आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या घरी गेला असतात, तर समजलो असतो. ठीक आहे, आजीकडे गेल्यावर आजीनं काय सुनावलं हे आपण पाहिलं. यात सर्वात महत्वाचं, एका महिला खासदाराला नामोहरम करताना, पहिल्या दिवशी दुसरे सेक्शन आणि नंतर राजद्रोहाचे सेक्शन. हनुमान चालिसा म्हटल्यानं राज्य उलथवलं असा कट होतो, यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं"
 
नवनीत राणांना तुरुंगात हीन वागणूक
 
"या महाराष्ट्रात हनुमान चालिसा केल्यानं राजद्रोह होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येकजण राजद्रोह करण्यास तयार आहे. हे सरकार जसं वागतंय, ते महाराष्ट्राला लज्जा आणणारं आहे.
 
नवनीत राणांना जेलमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आलीय. पिण्याचे पाणी दिले जात नाही, वॉशरूमला दिले जात नाही. त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून संसदेच्या सभापतींकडे तक्रार केली गेलीय.
 
एका महिलेला हनुमान चालिसा म्हणते म्हणून 124-अ अंतर्गत तुरुंगात टाकलं जात असेल आणि दलित असल्याची जाणीव करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलेलं आहे", असं फडणवीस म्हणाले.
 
पूर्वी नवरात्रीत रात्रभर जागरण करायचो, रात्रभर गरबा करायचो, रात्रभर भजन व्हायचं. किंवा कुठल्याही हिंदूंचा सण रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचो. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं रात्री 10 वाजेनंतर माईक चालणार नाही, त्या दिवसापासून आम्ही ते पाळलं. सूट मिळाली तरच 12 वाजेपर्यंत चालवतो. 100 वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यात विसर्जनाच्या मिरवणुकीतही देशी वाद्यापेक्षाही काही वाजवत नाही. हे हिंदू समाज मान्य करत असेल तर इतर सर्व समाजाने मान्य केल पाहिजे.
 
दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन, आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याची विनंती केली. यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "गृहसचिवांबरोबर 20 मिनिटं चर्चा केली. राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. फक्त धमक्या देत नाहीत तर जीव घेण्याचा प्रयत्न करतात."
 
पोलिसांच्या हजेरीत उद्धव ठाकरेंचें गुंड मारहाण करतात, असंही यावेळी सोमय्यांनी सांगितलं.
 
"मला मारायचा प्रयत्न होतो, ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं आहे. तीनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिकाराचा दुरुपयोग केला जात आहे. पुण्यातल्या हल्ल्याचं फुटेजही सरकारला दिलं," असंही यावेळी सोमय्यांनी सांगितलं.
 
ठाकरे सरकारची तक्रार करायला किरीट सोमय्या दिल्लीत
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मुंबई भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहसचिवांकडे जाऊन सोमय्यांनी ठाकरे सरकारची तक्रार केली.
दोन दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात जात असताना, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली.
 
किरीट सोमय्या यांच्यासोबतच्या मुंबई भाजपच्या शिष्टमंडळात आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, भाजपचे महापालिकेतील नेते विनोद मिश्रा अशा नेतेमंडळांचा समावेश आहे.
हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
 
ठाकरे सरकारकडून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न - सोमय्या
"माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी घडवून आणला", असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव आहे, असंही ते म्हणाले.
 
"उद्धव ठाकरे सरकारकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला. खार पोलीस स्टेशनबाहेर 70-80 लोकांचा जमाव कसा जमतो? हल्ला होईल याची कल्पना पोलिसांना दिली होती.
 
"पोलिसांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली होती. माझ्या हल्ल्याला पोलीस कमिशनर संजय पांडे जबाबदार आहेत. पोलिसांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित आहेत. पोलीस स्टेशनच्या दारात एवढी माणसं कसे जमू शकतात. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून गाडीत बसलो. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला", असं सोमय्या म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "खोटं एफआयआर किरीट सोमय्याच्या नावाने रजिस्टर केलं आहे. हे मॅनिप्युलेटिव्ह फेक एफआयआयआर. तुम्ही सही केली नाही तरी हेच एफआयआर असं सांगण्यात आलं आहे. ही माफियागिरी. सरकारप्रणित हल्ला आहे. पोलिसांशी हातमिळवणी झाली होती".
 
"केंद्र सरकारने Z सेक्युरिटी दिली आहे. कालच्या हल्ल्यात काच माझ्या हनुवटीला लागली. आणखी वर लागलं असतं तर मी आंधळा झालो असतो. राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना चौकशी करायला सांगितलं आहे. भाजप शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे.
 
वाशिममध्येही माझ्या गाडीवर हल्ला झाला होता. कालही माझ्यावर हल्ला झाला. आतापर्यंत तीनवेळा मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्राची जनता माझ्याबरोबर आहे", असं सोमय्या म्हणाले.
 
"खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. कमांडोंमुळे मी आज जिवंत आहे. खार पोलीस स्टेशनच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली. चहा प्यायलो. तुम्ही सुरक्षित जाऊ शकता असं मला सांगण्यात आलं. माझी गाडी बाहेर आली आणि 70-80 लोकांनी माझ्यावर हल्ला केला", असं सोमय्या म्हणाले.
 
"काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या, चप्पल फेकण्यात आल्या. दगडफेक करण्यात आली", असं सोमय्या यांनी सांगितलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती