माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. माधव गोडबोलेंचं निधन

सोमवार, 25 एप्रिल 2022 (12:50 IST)
भारताचे माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
डॉ. माधव गोडबोले यांनी 1959 साली भारतीय प्रशासन सेवेत पदार्पण केलं. मार्च 1993 मध्ये भारत सरकारचे ते केंद्रीय गृहसचिव होते. या पदावरूनच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
 
त्यापूर्वी ते महाराष्ट्रात प्रधान वित्त सचिव, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष आणि ऊर्जा सचिव, उद्योग आयुक्त, तसंच मुख्यमंत्र्यांचे सचिव अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं.
 
1980 ते 1985 या पाच वर्षात फिलिपाईनच्या मनिला येथील आशियाई विकास बँकेवर प्रतिनियुक्तीवर होते.
 
केंद्र सरकारच्या सेवेत ते एका दशकाहून अधिक काळ कार्यरत होते.
यशवंतराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री आणि वित्तमंत्री असताना त्यांनी भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू सचिव, नगरविकास सचिव आणि गृहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला.
 
माधव गोडबोलेंचा जन्म 15 ऑगस्ट 1936 रोजी झाला. अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून त्यांनी 'विकासाचे अर्थशास्त्र' या विषयात एमए आणि पीएचडी केली.
सेवानिवृत्तीनंतर माधव गोडबोलेंनी वाचन आणि लेखनावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्यातून विविध पुस्तकं मराठीजनांपर्यंत पोहोचली.
 
माधव गोडबोलेंचं लेखन :
 
इंदिरा गांधी एक वादळी पर्व
कलम 370
हरवलेले सुशासन
भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
लोकपालाची मोहिनी
भारताची धर्मनिरपेक्षता धोक्याच्या वळणावर
जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व
अपुरा डाव
प्रशासनाचे पैलू (खंड एक आणि दोन)
आस्वादविशेष
फाळणीचे हत्याकांड
माधव गोडबोलेंनी दहाहून अधिक इंग्रजी आणि तितकीच मराठी पुस्तकं लिहिली. 'अपुरा डाव' हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र, मासिकांमधूनही सातत्यानं लेखन केलं.
 
त्यांच्या 'जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन' या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती