अंजनेरी मध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात

गुरूवार, 6 एप्रिल 2023 (20:53 IST)
हनुमानाच्या जन्मगावी अर्थातच नाशिकच्या अंजनेरी मध्ये तर पहाटेपासूनच भाविकांनी मारूती रायाच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या अंजनेरी डोंगरावर वायुपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले अशी आख्यायिका आहे. रामनवमीपासूनच येथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात करण्यात येते.
 
सप्तचिरंजीवांपैकी एक व बुध्दी आणि शक्तीची देवता असलेल्या पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर व परिसरात मोठया भक्तीपुर्ण वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमंताचं जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावर जन्मोत्सव सोहळ्याचं विशेष महत्व आहे. पौराणिक कथेनुसार मारुतीरायाचा जन्म सुर्योदय समयी झाला, त्यामुळे शेकडो भाविक रात्रीच मुक्कामासाठी अंजनेरी गडावर रवाना झाले.
 
जन्मस्थळी हनुमानाच छोटं मंदिर असुन मंदिरात अंजनी मातेच्या मांडीवर बसलेली बाल हनुमानाची मुर्ती आहे. पहाटे या मुर्तींना शेंदुर लेपन करून साजश्रृंगार करण्यात आला. नंतर विधिवत पुजन करण्यात आले. सुर्योदयाच्या वेळी हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बजरंग बली च्या जयजरकाराने परिसर दणाणुन गेला. दिवसभर हजारो भाविकांनी डोंगरावर चढून हनुमंताचे दर्शन घेतले. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती