नाशिकमध्ये गारपीट, 2 मृत्यू, गारामुळे राजकोटला हिल स्टेशनचं रूप

सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (09:28 IST)
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. रविवारी ( 26 नोव्हेंबर) अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
 
याचा सर्वाधिक फटका द्राक्षाच्या पिकाला बसला आहे. गारपिटीमुळे करोडो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
 
रविवारी दुपारी चार साडेचार नंतर निफाड, लासलगाव, नैताळे, देवपूर, पचकेश्वर, रानवड, नांदुर्डी, रेडगाव, पालखेड मिरची परिसरात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला.
 
निफाड तालुक्याच्या इतरही भागात गारपिटीनं मोठं नुकसान झालं आहे. बऱ्याच ठिकाणी गारांनी द्राक्षांचे घड गळून पडले.
 
गारांच्या तडाख्यानं काही भागात द्राक्ष पिकांचं 100 टक्के नुकसान झालं आहे. द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान होऊन आर्थिक गणित बिघडलं आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यान, देशातील विविध भागात सोमवारी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामाना विभागाने वर्तवला आहे.
 
महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे.
 
मुंबई आणि दिल्लीमध्येही आज सोमवारी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
तर गुजरातच्या राजकोटमध्ये हवामानात अचानक बदल झाला आणि रविवारी ( 26 नोव्हेंबर) पावसासह गारपीट झाली. गुजरातमध्ये तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवली होती.
 
त्यामुळे राजकोट-अहमदाबाद महामार्गावर आज एक अद्भूत दृश्य पाहायला मिळालं.
 
खरंतर, कोणत्याही हिल स्टेशनप्रमाणेच, रस्त्यावर शुभ्र बर्फाची चादर होती.
 
मग काय, हायवेवरून जाणार्‍या लोकांनीही आपली वाहने थांबवली आणि शिमला आणि मनालीचा अनुभव घेऊन रस्त्यावर पसरलेल्या गारांच्या शुभ्र चादरीचा आनंद लुटू लागला.
राजकोटचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
गारपीट कधी होते?
विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात.
 
हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.
बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर.
 
ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते.
 
ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.
 
गारा घडताना
या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.
हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.
 
हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं.
 
पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.
 
गारेच्या अंतरंगात डोकावताना
प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात.
 
एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो.
 
गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते.
 
आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.
 
एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं.
 
ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन.
 
एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती