नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्ट छापण्याचा मार्ग मोकळा

सोमवार, 21 मार्च 2022 (21:31 IST)
देशभरातील सर्व ई-पासपोर्ट नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छापण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण ई-पासपोर्टच्या छपाईसाठी आवश्यक असलेल्या यंत्र खरेदीसाठी जागतिक टेंडर काढायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसे संकेत नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाला देण्यात आले आहेत.
 
दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिकच्या नोटप्रेसमध्ये ई पासपोर्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नोटप्रेसवर मोठी जबाबदारी आली होती. त्यानुसार आता नोट प्रेसमध्ये नवी मशिनरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुद्रांक, धनादेश, मद्याचे सील, पोस्ट तिकिटांची छपाईसह इतर कामांचा मार्क मोकळा झाला आहे. पासपोर्ट छपाईसाठी वेगळा कागद लागतो. तसेच इतर अनेक तुंबलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्तिक डांगे यांनी परराष्ट्रा मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतली होती. त्यानंतर हा विषय मार्गी लागला आहे. आता लवकरच हे टेंडर काढण्यात येणार असल्याचे समजते.
 
देशभरातील सर्व ई-पासपोर्ट नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छापले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात केली. आतापर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने चाचणीकरिता २० हजार ई-पासपोर्ट बनवून दिले आहेत. यापुढे दिवसाला ५० हजार ई-पासपोर्ट बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास २५ ते ३० कोटी पासपोर्ट बनवण्याचे काम इंडिया सिक्युरिटी प्रेसला मिळणार आहे. मार्च महिन्यात हे काम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, यंत्र खरेदीमुळे हे काम रखडले होते
 
केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. त्यामुळे पासपोर्टमधील कुठलिही माहिती लिक होणार नाही. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी सुद्धा सुरक्षित राहील. या पासपोर्टशी कोणी छेडछाड केली, तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे या पासपोर्ट गैरवापर टळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या कामाची धुरा नाशिकवर येऊन पडली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती