हॉटेलवर सुरु असलेल्या साखरपुड्यातून साडेदहा लाख किमतीच्या सोन्याची चोरी

गुरूवार, 21 एप्रिल 2022 (21:46 IST)
पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी फाटा (ता. करवीर) हॉटेल पार्कइन या या ठिकाणी बुधवारी रात्री साखरपुड्याचा कार्यक्रम चालू असताना नववधूचे साडेदहा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
 
ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून कोल्हापूर येथील व्यापारी महेश महादेव नष्टे (वय ५२) राहणार लक्ष्मीपुरी यांच्या पुतणीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी या कार्यक्रमासाठी मुलीला लागणारे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, सव्वा दोन तोळे वजनाचे चेन, साडेसात तोळे पाटल्या, तीन ग्रॅम वजनाची नथ, सोन्याचे चार तोळे वजनाचे दोन नग असे एकूण दहा लाख ५४ हजार रकमेच्या सोन्याची चोरी झाल्याची नोंद आज सकाळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार सनदी व सपोनि माने करीत आहेत.
 
या हॉटेलवर यापूर्वीसुद्धा चोरीचे प्रकार बऱ्याच वेळा घडलेले आहेत. या महामार्गावर अशी बरेच हॉटेलवजा हॉल आहेत, शिवाय मंगल कार्यालयेसुद्धा भरपूर आहेत. परंतु आजपर्यंत अशा वारंवार घटना इथे कुठेही घडलेल्या नाहीत पण या हॉटेलवरच सातत्याने अशा घटना का घडतात असा सवाल व संभ्रम निर्माण झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती