एकनाथ शिंदे बंड : बंडखोर नेत्यांच्या घरी जाऊन आंदोलन करा- आदित्य ठाकरे

मंगळवार, 21 जून 2022 (23:49 IST)
उद्धव आणि शिंदे यांच्यात 15-20 मिनिटं चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांचं मन वळवायला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरून ही चर्चा झाली. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की भाजपाबरोबर जायला हवं, यातच पक्षाचं हित आहे. तसंच मी सेना सोडली नाही, मी बाळासाहेबांचा सैनिक आहे असंही ते पुढे म्हणाले.
 
त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत येण्याचं आमंत्रण दिलं आणि तिथे येऊन चर्चा करू असं सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी बंडखोर नेत्यांच्या घरी जाऊन आंदोलन करा असे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
 
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली आहे.
 
शिवसेनेचे सरचिटणीस आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सुरतमध्ये दाखल झाले होते. साधारण 1 तासाच्या भेटीनंतर आता नार्वेकर मुंबईकडे रवाना झाले आहे. ली मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटकसुद्धा उपस्थित होते.
 
आमदार परत येतील - संजय राऊत
"एकनाथ शिंदे आमचे सहकारी आणि मित्र आहेत. अजूनही आम्ही त्यांचे वाट पाहतोय. आम्हाला खात्री आहे की, ते सर्व आमदारांसह परत येतील," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
 
"आमदारांना परत यायचंय. पण येऊ दिलं जात नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशाप्रकारे राज्य आणू पाहत असेल, तर देशासाठी गंभीर बाब आहे. अमित शाह यांनी यात लक्ष घालून, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री असल्याचे त्यांनी दाखवून द्यावं."
 
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेमानं मुंबईत यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही राऊत म्हणाले आहेत.
 
'वर्षा'वर शिवसेना आमदारांच्या बैठकीत काय झालं?
"एकनाथ शिंदे माझ्या संपर्कात आहेत. ते पुन्हा शिवसेनेत असतील," अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांना दिली.
 
प्रत्येक आमदारामागे दोन शिवसैनिक लावण्यात आले आहेत. आमदारांना पुन्हा हॅाटेलमध्ये ठेवण्यात येणार असून, आमदार काय करतात यावर लक्ष ठेवणार आहेत.
 
तसंच, यावेळी शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांना शपथ देण्यात आली आणि विभागप्रमुखांना दबाव बनवण्याचे आदेश देण्यात आली.
 
शिवसेनेचे रत्नागिरीतले आमदार भास्कर जाधव म्हणाले, "कुटुंबात अशा कुरबुरी होत असतात. आता परिस्थिती एकत्र राहण्याची आहे. त्यामुळे आमदार एकत्र राहत आहोत. बैठकीला कमी आमदार नव्हते. काही जण गावी होते. इथे यायला उशीर झाला त्यांना."
 
किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर
मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर या शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडावर बोलताना भावनिक झाल्या आणि बोलता बोलता त्यांचे अश्रू अनावर झाले.
 
"एकनाथ शिंदे साहेब, उद्धवजी तुमच्यासाठी चांगला निर्णय घेतील. तुम्ही परत या," असं कळकळीचं आवाहन किशोरी पेडणेकरांनी केलंय.
 
पेडणेकर पुढे म्हणाल्या, "उद्धवसाहेब सकाळीच म्हणाले की, एकनाथजी तुम्ही परत या, मी तुम्हाला मुख्यमंत्रिपद देतो. तुम्हाला गाजरं दाखवतायेत, ते मुख्यमंत्रिपद देणार नाहीत आणि दिलं तर मी तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन करेन. इतक्या मोठ्या मनाचा आमचा नेता आहे."
 
"आमचं घर फोडण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. भाजपच्या आमिषाला एकनाथ शिंदेंनी बळी पडू नये," असंही पेडणेकर म्हणाल्यात.
 
कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार - राऊत
"एकनाथ शिंदेशी चर्चा झाली आहे. त्याबाबत आता मिलिंद नार्वेकर आणि रविद्र फाटक उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील. आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार आहोत," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
"एकनाथ शिंदेंची नाराजी आताच कालपरवा समोर आली आहे. भाजपनं कशी वागणूक दिली आहे याचे एकनाथ शिंदे साक्षीदार आहेत," असंसुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
दरम्यान भंडाऱ्याचे शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर सुरतमधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. मिलिंद नार्वेकर पोहोचण्याच्या काही मिनिटं आधीच तिथं दाखल झाल्याचं तिथं उपस्थित बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांनी सांगितलं आहे.
 
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सुरतमध्ये दाखल झाले आहेत.
 
"काही आमदार सुरतमध्ये आल्याचं मला कळालं आहे, पण मी कुठल्याही आमदाराची भेट घेतलेली नाही," असं भागवत कराड यांनी म्हटलंय.
 
एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान जागृत झालाय- नारायण राणे
मुख्यमंत्रिपदाची शान उद्धव ठाकरेंनी घालवली. यानंतर महाराष्ट्रात काय होतंय ते येत्या काही तासात पाहूया. एकनाथ शिंदे यांची फसवणूक झाली आहे. त्यांना वेळोवेळी खर्च करायला लावला, त्यांना मुख्यमंत्री करतो असं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. हे अनेकदा एकनाथ शिंदेंबद्दल घडलं आहे.
 
म्हणून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांनी हे बंड पुकारलं. मुख्यमंत्र्यांनी कधीही आयुष्यात दिलेला शब्द पाळला नाही. त्यांना शब्द द्यायचा माहिती नाही, पाळायचा तर त्याहून माहिती नाही.
 
एकनाथ शिंदे नामधारी नगरविकास मंत्री आहेत. मातोश्रीच्या बाहेर कोणालाही अधिकार नाही. नगरविकास खात्यात वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे वारंवार हस्तक्षेप करत होते. वर्षावर आत्ता फक्त 11 आमदार आहेत.
 
एकनाथ शिंदेंची बंडानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
'नॉट रिचेबल' एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे पहिल्यांदाच आपली भूमिका मांडलीय.
 
एकनाथ शिंदेंनी ट्वीट केलंय की, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."
 
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी हे शिवसेनेचे विधमंडळातील नवे गटनेते असतील.
 
अजय चौधरी शिवसेनेचे शिवडीहून आमदार आहेत. ते पहिल्यांदा 2014 मध्ये निवडून गेले आहेत. 2015 मध्ये ते नाशिकचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख झाले. 2019 मध्ये ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत.
 
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील 11 आमदारांसोबत त्यांनी सुरतच्या ल मेरेडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री संजय कुटे सूरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे भाजपनंही आता आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचं स्पष्ट होत आहे. निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
 
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सोमवार संध्याकाळपासून आहे. आमदार संपर्क कक्षेच्या बाहेर गेल्याचं कळताच वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबई आणि परिसरातील आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.
 
दरम्यान शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली आहे. मतदानानंतर सायंकाळी 6 वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांचा फोन बंद येत आहे. त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
 
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय? अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सकाळी राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची तातडीची बैठक झाली असताना दुसरीकडे राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
 
'शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान शासकीय निवासस्थान 'वर्षा'वर शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील देखील उपस्थित होते.
 
सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर आमदार डॉ. राहुल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. हे बंड शमवलं जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
"वर्षा बंगल्यावर अनेक आमदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. सूरतमध्ये सुरू असलेलं बंड लवकरच शमवलं जाईल. शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे," असं राहुल पाटील म्हणाले.
 
शिवसेनेचे नेमके किती आमदार यावेळी उपस्थित आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला, 'लवकरच या गोष्टी सर्वांना समजतील,' असे ते म्हणाले.
 
आमचे सर्व आमदार संपर्कात - काँग्रेस
काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात, असल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
काँग्रेसचे काही आमदार नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या तसंच असत्य आहेत, असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.
 
तसंच बाळासाहेब थोरात यांच्या राजीमान्या संदर्भातील बातम्या चुकीच्या असून खोडसाळपणे पेरल्या जात आहेत ते त्यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं थोरात यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग निघेल, असा विश्वास आहे - शरद पवार
"महाराष्ट्रात जे आता होतंय, ते गेल्या अडीच वर्षात दोनवेळा झालंय. हे तिसऱ्यांदा होतंय. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या पेचातून मार्ग निघेल, याची खात्री आहे," असं शरद पवार म्हणाले.
 
महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असंही यावेळी पवार म्हणाले.
 
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची इच्छा असल्याच्या चर्चांवर माध्यमांनी प्रश्न विचारले असता पवार म्हणाले, "मुख्यमंत्रिपद कुणाला देणं हा शिवसेनेचे अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात जसं सरकार चाललंय, ते पाहता बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही."
 
"आघाडीत मतभेद नाहीत. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय नाही, हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे," असं पवार म्हणाले.
 
विधान परिषदेत जशा क्रॉस व्होटिंग झाल्या, त्या क्रॉस व्होटिंग होतात, असंही पवार म्हणाले.
 
या घडामोडींवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, "जोवर उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्ष मजबूत आहेत, तोपर्यंत सरकारला धोका नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. हे वादळ लवकरच शमेल. शिवसैनिक सगळे एकत्र येतील असं मला वाटतं."
 
"विधानपरिषद पराभवाचा या सगळ्याशी काही संबंध आहे, असं मला वाटत नाही. उमेदवार पडतो म्हणून सरकारला धोका निर्माण होतो असं काही नाही," असंही छगन भुजबळ म्हणाले.
 
शिवसेनेविरोधातील कटकारस्थान - नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे म्हटले आहे.
 
गोऱ्हे म्हणाल्या, "एकनाथ शिंदे आमचे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. एकनाथ शिंदे नेहमीच भेटतात पण रोज सगळे नेते एकमेकांना भेटत नाही. किती तासांपासून, किती सेकंदापासून ते नॉट रिचेबल आहेत याची मला कल्पना नाही.
 
"अतिशय कार्यक्षम आणि कार्यबाहुल्य असणारे नेते आहेत. विधान परिषदेच्या कामासाठी त्यांनी अनेक दिवस गुंतवून घेतलं होतं. दिवसरात्र कामं सुरू होती. त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी आहे. काल मतदान झाल्यानंतर पक्ष कार्यालयात आम्ही जमलो तेव्हा एकनाथ शिंदे तिथे होते.
 
"चर्चा करत होते, बोलत होतो. मुख्यमंत्र्यांनी येऊन आमदारांशी बातचीत केली होती. आताच्या घडीला ते कुठे आहेत यावरून तर्कवितर्क करण्याची गरज नाही. ते लवकरच सगळ्यांच्या संपर्कात येतील.
 
"शिवसेनेविरोधात कटकारस्थानं रचली जातात त्याच्या पाच पायऱ्या आहेत. अशा विचारातून काही साधलं नाही तरी विधायक कामावर पाणी फेरलं जातं. हितशत्रूंचा डाव असतो. प्रत्येक आमदार मला कुठे ना कुठे भेटलेले आहेत. एकनिष्ठ आणि प्रामाणिक असे आमदार आहेत जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ देतात. आम्हाला मतदानावेळी आमचा कोटा व्यवस्थित मिळाला होता. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले.
 
"बिनबुडाच्या निराधार बातम्या आहेत. कुणाची मतं कुठे गेली आहेत याबद्दलचा निष्कर्ष अंतर्गत अभ्यास-चर्चेनंतरच कळू शकतो. निवडून आल्यानंतर आम्ही मातोश्रीवर जातो. विजयी उमेदवारांना वहिनी रश्मी ठाकरे ओवाळतात.
 
"ही एक परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीत गैरसमज पसरतात. वर्षावर भेटायला जाणं आणि आज जी बैठक आहे यामध्ये दैनंदिन कामं असतात. काहीतरी वाईट घडलंय म्हणून बैठक बोलावलेय असं नाही. शिवसेनेचं यश आहे ते झाकण्यासाठी अपप्रचार केला जात आहे," असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
 
आज दुपारी 12 वाजता शिवसेना आमदारांची बैठक पुन्हा एकदा बोलावण्यात आली आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.
 
शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती