बायोवेट कंपनीला तातडीने जागा द्या, कंपनी कोरोना लसनिर्मिती करणार

बुधवार, 12 मे 2021 (13:12 IST)
लस उत्पादक ‘भारत बायोटेक’ची सहकंपनी बायोवेट कंपनीच्या प्लांटसाठी पुण्यात 30 एकर जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिली. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 ते म्हणाले, भारत बायोटेक कंपनीची सहकंपनी असलेल्या बायोवेट कंपनीला लसनिर्मिती करण्यासाठी पुण्यातील मांजरी खुर्द भागातील 12 हेक्टर म्हणजेच 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता संबंधित कंपनी लसनिर्मिती करणार असल्याने ही परवानगी दिली गेली आहे. ही कंपनी भारत बायोटेक उत्पादित करत असलेली ‘कोव्हॅक्सिन’ लसची निर्मिती करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने संबंधित कंपनीला तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत, असे पवारांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील हाफकिन संस्थेनंतर आता पुण्यातही ‘कोव्हॅक्सिन’ लसनिर्मिती होणार आहे. हाफकिन पुढील वर्षापासून महिन्याला दीड 
ते दोन कोटी ‘कोव्हॅक्सिन’चे डोस उत्पादित करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती