देशात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महत्वाचे असलेले Remdesivir & Tocilizumab या औषधांना मागणी वाढली आहे. या औषधांचा बाजारात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन भामटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. Cipla Pharma Company या नामांकीत कंपनीचे Remdesivir & Tocilizumab औषध देण्याचे अमिष दाखवून विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी अशा भामट्यांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करुन संबंधित कंपनी डिस्ट्रीब्युटर किंवा उच्च पदावर कामावर असल्याचे सांगून Remdesivir & Tocilizumab औषधाची आवश्यकता असल्यास संपर्क करण्यास सांगितले जात आहे. तसेच बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात येत आहे. अशा जाहीराती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा जाहीरातींवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. तसेच जाहीरातीमध्ये दिलेल्या कोणत्याही लिंक किंवा मोबाईलवर संपर्क साधून नये, जाहीरातीत दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांनुसार, कोणत्याही कंपनीला किंवा कंपनीत काम करत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना Remdesivir & Tocilizumab हे परस्पर विकता येत नाही. संबंधित कंपनी ही Remdesivir & Tocilizumab हे औषध सरकारी रुग्णालय, खासगी रुग्णालय यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करुन देत असते. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडियावर येणाऱ्या जाहीरातींवर विश्वास ठेऊ नका. तसेच असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.