दिवाळी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते. याकडे राजकारण म्हणून बघण्याचे कारण नाही. पण राजकारणात काहीही अशक्य नसते, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप – बाळासाहेबाची शिवसेना व मनसे महायुतीचे संकेत दिले. त्र्यंबकेश्वर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी महाजन म्हणाले की, मुंबई महापालिकेतही सत्ता भाजपाची येणार आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही एकत्र आहोत. मनसे बाबत पक्ष श्रेष्ठी काय तो निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. मिलिंद नार्वेकर यांच्या नाराजीच्या प्रश्नांवर बोलतांना ते म्हणाले की, नार्वेकर यांचे अमित भाईंशी चांगले संबंध आहे. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर नाराज आहे. शिवसेनेत कोण राहील कोण जाईल हे सांगता येत नाही असे सांगून त्यांनी टोमणाही मारला.
यावेळी भुजबळांच्या टोलसंबधी प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, भुजबळ पालकमंत्री असतानाच टोल बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. खड्ड्यांमुळे मला देखील आज ट्रेनने यावे लागले. पण, मात्र खड्डयांबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील बोललो. लवकरात लवकर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्याशी देखील मी बोलणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करतांना सांगितले की, काँग्रेसला आता तडफदार नेतृत्व मिळाले आहे काँग्रेसने भारत जोडो यात्रा नसती केली तर झाकली मूठ राहिली असती. आता काँग्रेसला काम राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय काही राहीलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.