पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – २०१९ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

बुधवार, 9 मार्च 2022 (15:11 IST)
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक  परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.
 
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेची जाहीर केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र/कागदपत्रे यांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो, असेही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी सांगितले. त्याशिवाय ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९  अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference/Opting Out हा दुवा (वेबलिंक) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक उद्या, ९ मार्च, दुपारी ३ वाजेपासून १६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे सांगून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही, असेही श्री. निंबाळकर यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती