गडचिरोली पोलिसांच्या सी ६० कमांडो पथकाच्या टीमला जिल्हा नियोजन फंडातून ५१ लाख रुपये बक्षिस

मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (08:36 IST)
ग डचिरोली जिल्ह्यातील कोलगुट-ग्यारापल्ली जंगलात २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांच्या सी ६०  कमांडो पथकाच्या टीमला जिल्हा नियोजन फंडातून ५१ लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना तसे निर्देश दिलेले आहेत.
 
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकित पोलिसांच्या सी ६०  पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत ४  पोलीस जवान देखील जखमी झाले होते. पालकमंत्री शिंदे यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन या जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जाऊन सी ६०  पथकातील पोलिसांची देखील भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 
यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल आणि पोलीस महासंचालक संदीप पाटील यांच्याकडून या चकमकीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या जवानांचे अभिनंदन करण्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून त्यांना ५१ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचे अभिनंदन करण्यासोबतच त्यांना हे विशेष बक्षीस देत असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती