दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:24 IST)
जळगाव : चोपडा शहरातील प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्या. पी.आर चौधरी यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. तर दोन आरोपींना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मदत केल्याप्रकरणी ५ वर्ष शिक्षा एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील मयत वर्षा समाधान कोळी व राकेश संजय राजपूत यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. तरुणीने तरुणासोबतचे प्रेमसंबंध तोडावे म्हणून त्यांच्या कुटुंबात वाद सुरु होते. दि. १२ ऑगस्ट रोजी वर्षा व राकेश यास बोलतांना पाहिल्यावर याचा राग येऊन राकेशच्या बहिणीला पकडल्याने त्यांची विचारपुस केली असता, त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या बहिणीला व तिचा प्रियकर राकेश राजपूत याला मोटारसायकलवर बसवून त्यांना चोपड्याजवळील नाल्याजवळ जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, राकेश याने मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत पळून जात असतांना तुषार याने गावठी कट्टूयातून गोळीबार केल्यानंतर ही गोळी राकेशच्या डोक्यात लागून त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याची प्रेयसी वर्षा ही प्रतिकार करीत असताना तीचा देखील गळा आवळून खून केला होता. खून केल्यानंतर करण उर्फ कुणाल याने चोपडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
तपासाधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी तपास केला असता, यामध्ये संशयित आरोपींनी खुनावेळी वापरलेले जिवंत काडतुस व इतर वस्तू जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे कामकाज सुरू असतांना पैरवी अधिकारी सफौ उदयसिंह साळुंखे, हिरालाल पाटील, नितीन कापडणे, विशाल तायडे यांनी सहकार्य केले.
 
यांना ठोठावली जन्मठेप
खूनातील आरोपींनी साक्षीदार अॅड. नितीन पाटील यांच्याकडे जावून त्यांनी केलेल्या गुन्ह्यात सल्ला घेतला. सरकारी वकील अॅड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी २२ साक्षीदारांची तपासणी केली. त्यानंतर तुषार आनंदा कोळी (वय २३), भरत संजय रायसिंग (वय २२), बंटी उर्फ शांताराम अभिमन कोळी (वय १९), आनंद आत्माराम कोळी (वय ५६), रवींद्र आनंदा कोळी (वय २०, सर्व रा. चोपडा) यातील पाच संशयितांना जिल्हा न्यायाधीश न्या पी. आर. चौधरी यांनी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा तर पुरावा नष्ट करणाऱ्यास मदत करणाऱ्या अॅड, पवन नवल माली (वय २२) अॅड नितीन मंगल पाटील (वय ४३) या दोघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली
 
Edited by -Ratnadeep Ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती