यावल :दोन लाखांचे खैर लाकूड वन विभागाच्या ताब्यात, आरोपी फरार

बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:19 IST)
सातपुड्याच्या जंगलात तथा यावल तालुक्यात सर्रासपणे मौल्यवान वृक्षांची वृक्षतोड सुरू आहे. यावल वन विभागाने 1 एप्रिल रोजी रात्री अंदाजे बाजारभावाप्रमाणे दोन लाख रुपये किमतीचे खैर जातीचे लाकूड जप्त केले. परंतु वृक्षतोड करणारे आरोपी मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे असले तरी सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यात सागवानी खैर आणि आदी वृक्षतोड होत असताना सातपुडा डोंगराप्रमाणे वन विभागातील काही ठराविक अधिकारी, कर्मचारीही आपले कर्तव्य करताना तटस्थ भूमिका निभावत आहेत का? याबाबत सातपुडा डोंगर परिसरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
 
यावल पश्‍चिम वनक्षेत्राच्या सामूहिक गोष्टी पथक हे गस्त करीत असताना नाल्यात अवैधरित्या तोड केलेला खैर मिळून आला.वृक्षतोड झाल्यानंतर गस्ती पथकाला खैर जातीचे वृक्षतोड झालेली लाकडे मिळून येतात आणि आरोपी फरार होतात. वृक्षतोड करताना गस्ती पथकाला कोणी आढळून येत नाही का? सातपुडा जंगलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच वृक्षतोड होत असल्याचे दबक्या आवाजात चर्चिले जात आहे. सोमवारी खैर जातीचे लाकूड जे जमा केले. ते जमा केल्यानंतर जप्त मालावर ‘जप्त शिक्का’ वनपाल, वनरक्षक संबंधित वनक्षेत्रपाल किंवा गस्तीपथक आरएफओ यांच्यापैकी कोणी मारला? माल केव्हा जप्त केला? किती वाजता ताब्यात घेतला आदी माहिती प्रसिद्धी माध्यमापासून लपविण्याचे कारण काय? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती