रोहयाच्या प्रवेशद्वारावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत, परिणामी रोहा नागोठणे राज्यमार्ग धोकादायक बनला आहे, अष्टमीतिल दोन्ही पेट्रोल, सीएनजी पंपातील वाहनांना त्यामुळे धोका निर्माण झालेला असून बांधकाम विभाग करतोय काय ? येथे अपघात होऊन नेहमीप्रमाणे एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच झोपी गेलेल्या बांधकाम विभागास जाग येईल का ? असा संतप्त सवाल वाहनचालक नागरिकांकडून केला जात आहे.
रोहा नागोठणे राज्यमार्ग रोहा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या रेल्वे स्टेशन, अष्टमी नाका या ठिकाणी दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक होत आहे. निर्माणाधीन असलेल्या रेल्वे उड्डाणपूल, अष्टमी नाका या परिसरात असलेले पेट्रोल, व सीएनजी पंप यांचे समोर मोठमोठे जीवघेणे खड्डे गेले कित्येक महिने पडलेले आहेत.
हे खड्डे चुकवत व त्याच्याच समोर असलेल्या पंपांच्या मधून बेदरकार बाहेर पडणारी वाहने यांच्यावर लक्ष ठेवत जीव मुठीत घेत येथून मार्ग काढावा लागत आहे. गणेशोत्सव, नवरात्री, धावीर पालखी असे मोठे उत्सव होवुनही या मार्गाची झालेली दुरावस्था व मार्गाच्या वाहतूकीसाठी अडथळा निर्माण करणार्यांवर आजवर रोहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
रोहा नागोठणे अलिबाग या दोन महत्वाच्या राज्यमार्गावरुन रोज हजारो वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. याच मार्गावर रोहे रेल्वे स्टेशन, डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालय, धामणसई, मेढा, भातसई, यशवंतखार या विभागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार यांची वर्दळ असते.
अशा रोहा शहराशी ग्रामीण भागाला जोडणार्या या मार्गावरील खड्डे व होत असलेल्या उड्डाणपुला मुळे झालेली दुरावस्था ही अपघातास निमंत्रण देणारी आहे. अष्टमी जवळील सीएनजी , पेट्रोल, पंपा समोरील खड्डे हे अत्यंत धोकादायक आहेत. एखादे छोटे वाहन या खड्यात अडकले असता त्यातून ते बाहेर काढणे अशक्य होत असल्याचे चित्र अनेकदा या ठिकाणी पहावयास मिळते.
बंद रेल्वे फाटक उघडल्यानंतर, स्थानकात रेल्वे थांबल्यानंतर येणार्या गाड्यांचा लोंढा व पायी जाणारे नागरिक यांना या ठिकाणाहून जाताना जिव मुठीत घेत जावे लागत आहे. मात्र आजवर या ठिकाणाहून अनेक बडे लोकप्रतिनिधी, दस्तुरखुद्द पालकमंत्री रोहात आले तरीही येथील खड्डे भरले जात नसल्याचे नागरिकांतुन आश्चर्य व्यक्त होत आहे. आजवर या ठिकाणी कोणताही अपघात झाला नाही. मात्र तो होण्याआधी व एखाद्या निष्पाप नागरिकाला गंभीर दुखापत होण्याआधी या संपूर्ण परिसरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची कारवाई रोहा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने करावी अशी मागणी नागरिकां कडून होत आहे.