शिंदे गटातील उतावीळ मंत्र्यांवर फडणवीसांची तीव्र नाराजी; परस्पर घोषणा न करण्याची तंबी

बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (08:04 IST)
राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिंदे गटामध्ये काही वाचाळवीर आणि प्रसिद्धीसाठी काही मंत्री आसूसलेले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आले. याची त्यांनी गंभीर दखल घेतली असून या मंत्र्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
 
काही मंत्री परस्पर नवनव्या घोषणा करत आहेत. या घोषणा कायद्याच्या कसोटीवर टिकण्याबरोबरच आर्थिक बोजाचा प्रश्नही समोर आल्याने अनेक विभागांनी संबंधित मंत्र्यांच्या घोषणांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या. मंत्र्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सरकारची कोंडी होत असून, पुढील काळात त्याचा अधिक त्रास होण्याची भीती असल्याने शिंदे- फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच अशा उतावीळ मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले.
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय शक्यतो मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जाहीर करतात. मात्र काही मंत्र्यांना निर्णय जाहीर करण्याची खूपच घाई झालेली दिसते. नुसती चर्चा झाली तरी निर्णय झाल्याचे ते बाहेर जाहीर करतात. यामुळे समज गैरसमज निर्माण होतात, तसेच ज्यांचे संभ्रम देखील निर्माण होतात. नवे सरकार स्थापन झाल्यापासून मनमानीपणे सवंग लोकप्रिय घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फटकारले. कोणताही सारासार विचार न करता घोषणा करू नका, कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, असे फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना सुनावले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिली. त्यामुळे प्रसिद्धीबाज मंत्र्यांची चांगलीच कानकोंडी झाली.
 
सध्या काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढू लागल्या असल्या तरी त्याची पूर्तता करताना सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्राच्या योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ट करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारमध्ये विचारमंथन सुरू आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही ‘गोपनीय बातमी’ प्रसारमाध्यमांमध्ये फुटली.
 
याबाबत नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली, अशी थेट विचारणाच फडणवीस यांनी सत्तार यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनीही सत्तार यांना खडसावले. त्यावरआपण निर्णय झाल्याचे म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचे सांगितले, अशी सारवासारव सत्तार यांनी केली.मात्र, त्याने कोणाचेही समाधान झाले नाही. कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत.
 
कोणतीही नवी योजना किंवा निर्णय घेताना त्याबाबत मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. केवळ विचार सुरू असताना घोषणा केल्यास त्या विषयाचे, निर्णयाचे महत्त्व निघून जाते. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका, असा इशाराच फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य मंत्रीही शिंदे-फडणवीस यांच्या आक्रमक भुमिकेमुळे चांगलेच चपापले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती