फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो
पेट्रोल, डिझेलचे दर कमी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्राचे आभार मानले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावरूनच कोपर खिळ्या मारल्या आहेत. फडणवीसांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “मोठी बातमी :पेट्रोल 9.5 रु/लिटर, डिझेल 7 रु/लिटर ने स्वस्त होणार! पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अनेकानेक आभार! केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.” असे ट्विट फडणवीसांनी केले आहे.
तसेच ते पुढे ट्विटमध्ये लिहितात की, आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो, असा टोला फडणवीसांनी लगावाला आहे.