राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. आम्हाला चर्चा करण्यावर विश्वास आहे. अनेक दिवसांनंतर 17 ते 18 दिवस चालणार अधिवेशन आम्हाला मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत हीच आमची भूमिका असेल. पण सरकारी पक्षाची जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार पुकारण्याची घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्याप्रकारे विजेचं कनेक्शन कापण्याचं काम या सरकारने सुरु केलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
म्हणजे गेली दोन वर्ष अस्मानी संकट आणि आता हे सुलताना संकट शेतकऱ्याला झेलावं लागतंय, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत. हे सावकारी सरकार आहे. उर्जामंत्री ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत त्यावरुन असं वाटतंय की लोकशाही राज्यात आहोत की तानाशाही राज्यात आहोत असं वाटतंय, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर तुम्ही राज्य करत आहात, त्यांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता, ही अहंकारी भूमिका सरकारने घेतली आहे, तो अहंकार आम्ही तोडायला लावू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.